ठाणे : ठाण्यातील मुंब्रा येथील शंकर मंदिर परिसरात असलेली 22 वर्षे जुनी शाखा पाडण्यात आली, त्यानंतर आज (ता. 11 नोव्हेंबर) येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. परंतु, या राजकीय वातावरणातही चर्चा होत आहे ती ‘सबसे कातील गौतमी पाटील’ हिच्या कार्यक्रमाची. दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मात्र दिवाळी पहाटनिमित्त गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू असून या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाची माहिती स्वतः गौतमी पाटील हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. (Gautami Patil’s dance program will be held in Thane on the occasion of Diwali Pahat)
हेही वाचा – भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये नामांकन
गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे नेहमीच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत असते. तर तिच्या कार्यक्रमामध्ये अनेकदा वाद देखील होत असतात. गौतमीची लावणी म्हटली की, अनेक लोक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. दिवाळी पहाटनिमित्त ठाण्यातील तलाव पाळी या भागांत हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. गौतमी पाटीलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीतील पोस्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे. तसेच ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचाही फोटो या पोस्टमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. गौतमीचा कार्यक्रम लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच म्हणजे उद्या रविवारी (ता. 12 नोव्हेंबर) होणार आहे. “लवकरच ठाण्यात” असे गौतमीच्या स्टोरीतील पोस्टमध्ये लिहिले आहे.
गौतमी पाटीलचे अनेक कार्यक्रम हे राज्यातील विविध भागांत झाले आहेत. आजपर्यंत ग्रामीण भागांतच गौतमीच्या लावण्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नेत्याचा वाढदिवस असो, बायकोचा असो किंवा बैलाचा वाढदिवस असो गौतमीचा कार्यक्रम ठेवला की तो दिवस खास बनणारंच. परंतु, तिच्या बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये होणारा गोंधळ व राड्यांमुळे अनेकदा ती चर्चेत आली आहे. त्यामुळे आता तिचा कार्यक्रम हा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच होणार असल्याने त्याबाबत जोरदार चर्चा करण्यात येत आहे. नुकताच मुंबईमध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.