गावंदेवी पार्किगच्या कामाला पुन्हा दोन महिन्यांची मुदतवाढ

 ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची तयारी

शहरातील पार्किगचा प्रश्न लवकर सुटावा यासाठी गावंदेवी मैदानात ३०० गाड्या पार्क होतील अशा मोठ्या प्रकल्पाचे काम सुरु असले तरी हे काम तब्बल दीड वर्ष रखडले आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित असताना हे काम अद्याप १५ टक्के अपूर्ण असून आहे. मात्र काम अपूर्ण असताना देखील संबधीत ठेकेदाराला तब्बल ८० टक्के बिल अदा करण्यात आले असून महापालिका ठेकेदारावर मेहरबान का आहे ? असा प्रश्न शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात यावी त्यानंतर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायचे कि नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सभापती संजय भोईर यांनी स्पष्ट केले.

भाजपचे नारसेवसक सुनेश जोशी यांनी गावंदेवी पार्किंगच्या संदर्भात शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित केला. गांवदेवी पार्किंगच्या कामांची मुदत संपली असताना अजूनही पार्किगचे काम पूर्ण झाले नसल्याची बाब त्यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली.याशिवाय संबधित ठेकेदाराला ८० टक्के बिल देखील अदा करण्यात आल्याची बाब ही त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये निर्दशनास आणून दिली. तर महापालिका कार्यकारी अभियंता विकास ढोले यांनी ठेकेदाराला येत्या फेब्रुवारी २०२२ पर्यंत काम करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. मात्र प्रशासनाच्या या उत्तराने स्थायी समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कामाची मुदत संपूनही ठेकेदाराला मुदत का द्यायची, ठाणे महापालिका ठेकेदारावर एवढी मेहरबान का आहे असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.

त्यानंतर स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी यासंदर्भात सर्व माहिती देण्याची सूचना प्रशासनाला दिली तसेच त्यानंतर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायचे कि नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल असे बैठकीत स्पष्ट केले.
तब्बल २७ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभा राहणार आहे. ७०० चौरस मीटरवर हे बांधकाम होणार असून यामध्ये १३० चार चाकी आणि १२० दुचाकी पार्क करता येणार आहे. जरी भूमिगत पार्किंगचे काम झाले तरी मैदानाचा वापर हा खेळांसाठीच होणार असून मैदान यासाठी पुन्हा पूर्ववत करून देण्याचा दावा प्रशासनाचा वतीने करण्यात आला आहे आला. केवळ भूमीगत पार्किंगमध्ये वाहने आत आणि बाहेर जाण्यासाठी ४ टक्के जागेचा वापर होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.