केडीएमसीतील अधिकारी कर्मचा-यांची संक्रांत गोड

 पालिका आयुक्तांकडून पदोन्नतीची भेट

kalyan dombivali corporation

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दीर्घ काळ रेंगाळलेल्या अधिकारी-कर्मचारी वर्गाचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावून मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला अधिकारी कर्मचारी वर्गास एक अनोखी भेट दिली आहे. वर्षोनुवर्षे एकाच पदावर कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांच्या पदोन्नती निवड यादीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी मंजुरी दिली.

केडीएमसीचा सुधारीत आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम 2021 ला नगरविकास विभागाने एक जून 2021 रोजी मंजुरी दिल्यानंतर मंजूर पदसंख्येनुसार आणि सेवा प्रवेश नियमानुसार अधिकारी आणि कर्मचा-यांचे पदोन्नतीचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी अतिरिक्त आयुक्त  सुनिल पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उप आयुक्त बाळासाहेब चव्हाण यांना निर्देश दिले होते. त्यानुसार आयुक्त अध्यक्ष असलेल्या विभागीय पदोन्नती समितीमधील अतिरिक्त आयुक्त्, उप आयुक्त, मुख्य लेखा परिक्षक, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी, अध्यक्ष-मागासवर्गीय कक्ष यांच्या समितीने 288 अधिकारी आणि कर्मचा-यांच्या पदोन्नतीचे विषय मार्गी लावले आहेत.

या कर्मचा-यांचा समावेश
या मध्ये प्रामुख्याने विद्युत कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, मुख्य  वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. दिपा शुक्ला, डॉ. प्रज्ञा टिके (सावंत), डॉ. पुरुषोत्तम टिके, डॉ. योगेश चौधरी, डॉ. हेमराज देवरे यांचा समावेश आहे.

कोणत्या किती पदांना लाभ
माहिती आणि जनसंपर्क अधिकारी एक, लघुलेखक उच्चश्रेणी चार,लेखाधिकारी दोन, मेट्रन दोन, मुख्य स्वच्छता अधिकारी एक, उप मुख्य  स्वच्छता अधिकारी एक, एक शिक्षणाधिकारी, क्रीडा अधिकारी, सुरक्षा अधिकारी, सिनियर प्लंबर, आरेखक, आरेखक कम अनुरेखक, सिस्टर इनचार्ज 42, स्टाफ नर्स 32, स्वच्छता अधिकारी 7, अग्निशमन आणि उप अग्निशमन अधिकारी 17, लिडींग फायरमन 30, चालक यंत्र चालक 4, मुख्याध्यापक 13 तर वर्ग चार वरील पदांवर नाईक शिपाई 6, वरिष्ठ सुरक्षा रक्षक 4, थिएटर अटेंडन्ट 14 तसेच 41 सफाई कर्मचा-यांना “ मुकादम” या पदासह विविध संवर्गातील एकूण 288अधिकारी आणि कर्मचा-यांना पदोन्नती  देण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने 9 दिव्यांग कर्मचा-यांचा देखील समावेश आहे. तसेच  उर्वरीत संवर्गाच्या पदोन्नतीबाबतची छाननी प्रक्रीया सुरु असून त्यावर देखील तातडीने निर्णय घेण्याबाबतचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांच्या या निर्णयाने सन 2012 नंतर प्रथमच इतक्या मोठया संख्येने पदोन्नती देण्याचा निर्णय आयुक्त डॉ. सूर्यंवशी यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय पदोन्नती समितीने घेतला आहे.  मकर संक्रांतीनिमित्त अधिकारी आणि कर्मचा-यांना गोड बातमी देऊन आयुक्तांनी अधिकारी व कर्मचा-यांचा आनंद द्विगुणीत केला आहे.