ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या – खासदार कपिल पाटील

शेतात तयार झालेल्या तसेच कापणी केलेल्या भातपिकाचे मुसळधार पावसामुळे नुकसान झाल्याने ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था संपूर्णत: भातपिकावर अवलंबून असते. पावसाळ्याच्या काळात भाताच्या पिकावर त्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह सुरू असतो. मात्र यंदा कापणीयोग्य झालेले व कापून ठेवलेले भातपिक मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहे. बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भाताची करपे पाण्यावर तरंगू लागली असून भाताच्या दाण्याला मोड येऊ लागले आहेत. या परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टर भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटापाठोपाठ पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. याकडे खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण आणि वाडा तालुक्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर परतीचा पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, ठाणे व पालघर जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा –

कोरोनामध्ये ८५ हजार बेरोजगारांना रोजगार