घर ठाणे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Subscribe

कोकण विभागात २ कोटी ७७ लाख रुपयांचे वाटप

शेतीमध्ये काम करताना किंवा इतर कारणामुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्या अथवा गंभीर जखमी झालेल्या कोकण विभागातील पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना किंवा जखमी शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून पहिल्या टप्प्यात सुमारे दोन कोटी ७७ लाख रुपये निधी वाटप करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्यात आला आहे.

शेतीमध्ये काम करताना किंवा इतर कारणास्तव अपघात होऊन कुटुंबातील कर्ता पुरुष मरण पावल्याने अथवा गंभीर जखमी झाल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडते. अशावेळी शेतकरी कुटुंबास आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशाने शासनाने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शासनाने ७ एप्रिल २०२२ पासून कंपनी नियुक्त केली होती. मात्र, त्यांच्याकडे शासनाकडून विमा हप्ता जमा नसल्यामुळे शासनाने २८ नोव्हेंबर २०२२ रोजी शासन निर्णयाद्वारे ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ हा खंडित कालावधी म्हणून जाहीर केला आहे. या कालावधीतील अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा स्तरावरून कृषी आयुक्तालय स्तरावर पाठवण्यात आले होते.
 शेतकऱ्यांच्या वारसांच्या खात्यात थेट रक्कम
या प्रस्तावास राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यात या कालावधीमध्ये कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील एकूण दोन कोटी ७७ लाख इतका निधी शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या खाती जमा करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात १६ मृत्यूच्या प्रकरणासाठी ३२ लाख रुपये, पालघर जिल्ह्यातील २३ मृत्यू प्रकरणासाठी ४६ लाख रुपये तर १ अपंगत्वासाठी एक लाख रुपये असा जिल्ह्यात एकूण ४७ लाख रुपये नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील ३६ मृत्यू प्रकरणासाठी ७२ लाख रुपये तर रत्नागिरी जिल्ह्यात २२ मृत्यू प्रकरणे व १ कायमस्वरूपी अपंगत्वासाठी २ लाख रुपये असे एकूण ४६ लाख रुपये नुकसान भरपाई वारसदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९ मृत्यू प्रकरणासाठी ७८ लाख रुपये तर २ कायमस्वरूपी अपंगत्वाचे प्रकरणासाठी ४ लाख रुपये असे एकूण ८० लाख रुपये वारसदारांच्या खाती जमा करण्यात आली आहेत.

- Advertisement -

अशी आहे योजना
शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे कि अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर २ लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाईल. शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले, तर २ लाख एवढा विमा देण्यात येतो. शेतकऱ्याचा अपघातामध्ये एक डोळा व एक अवयव निकामी झाला असेल, तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला २ लाख रक्कम विमाच्या स्वरूपात दिली जाईल. अपघातामध्ये शेतकऱ्याचा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल, तर त्याला १ लाख विमा दिला जातो.

” महाराष्ट्रातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहिवाटीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई, वडिल, लाभार्थीचे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना लाभ घेता येतो. ”

- Advertisement -

– अंकुश माने, विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग.

- Advertisment -