त्या ‘लखोबा’ने चौदा मुलींना घातला गंडा

 मिस्टर नटवरलालच्या हाती पडल्या बेड्या

मॅट्रीमोनियल साईटवरून महिलांना खोटे प्रोफाइल पाठवून महिलांना स्वतः उच्चपदस्य अधिकारी, शास्त्रज्ञ असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पैसे टाकायला लावून पसार होणाऱ्या आदित्य उर्फ नव्हुश उर्फ तन्मय प्रशांत म्हात्रे या मिस्टर नटवरलालच्या हाती अखेर बेड्या पडल्या. त्याला ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेच्या पथकाने अटक केली. तसेच त्याने आतापर्यंत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर तब्बल १४ महिला आणि मुलींची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला येत्या २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

मागील काही दिवसामध्ये जीवनसाथी डॉट कॉम, शादी डॉट कॉम अशा मॅट्रीमोनियल साईटवरून महिलांना खोटे प्रोफाइल पाठवून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्या कडून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या, त्यानुसार ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांच्या आदेशावरून मालमत्ता शाखा गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांनी शोध घेण्यास सुरवात केली होती.

कल्याण येथे एका महिलेने लग्न जमवणारी संस्था जीवनसाथी या मॅट्रीमोनियल साईटवर आपले प्रोफाईल टाकले होते. त्यातून त्या महिलेला या आरोपीने आपण इस्त्रो मध्ये वरिष्ठ पदावर शास्त्रज्ञ असून लग्न करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यावरून ओळख वाढवून त्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १४ लाख ३६ हजार रुपये वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात टाकायला लावले. तसेच महिलेकडे पुन्हा २५ लाखांची मागणी केली. या मागणीवरून संशय आल्याने त्या महिलेने खडकपाडा पोलीस स्टेशन गाठून तशी तक्रार दिली. त्या  गुन्ह्याचा तपास सुरू असताना नटवरलाल हा वारंवार राहण्याचे ठिकाण बदलून पोलिसांच्या डोळ्यात धूर फेकत होता.

मालमत्ता शाखा गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांनी समांतर तपास करून तांत्रिक माहितीच्या आधारे आणि अत्यंत कौशल्याने तपास केला. त्यावेळी  तो आणखी एका मुलीस लग्नाचे आमिष दाखवून भेटण्याच्या निमित्ताने वाशी येथे भेटायला आला असता त्याला ताब्यात घेतले. चौकशीत हा इसम विवाहित असून त्यास एक मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. इस्त्रो किंवा एखाद्या मोठ्या पदावर नोकरी करत असल्याची थाप मारून त्याने आतापर्यंत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर तब्बल १४ महिला आणि मुलींची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले.  याबाबत आणखी काही महिला तक्रार घेऊन पुढे येत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीला २० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याच्यावर मुंबईतील दिंडोशी, पार्कसाईट, ठाणे शहर पोलीस दलात खडकपाडा, पुण्यात सांगवी, अलिबाग,नवी मुंबई, रबाले आणि एपीएमसी या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे.