वीटभट्टीवरील ४ हजार ३९९ स्थलांतरीतांची आरोग्य तपासणी

महिला, स्तनदा माता, बालकांचा समावेश

Doctors desk with patients test results, samples, stethoscope and blood pressure gauge

जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील वीटभट्टीवरील स्थलांतरीत गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, व शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागा वतीने एकात्मिक बाल विकास क्षेत्रात या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून आतापर्यंत ४३९९ स्थलांतरीतांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी क्षेत्रात वीटभट्टीवर काम करण्यासाठी जिल्ह्यातील तसेच बाजूच्या जिल्हयातील बहुतेक आदिवासी कुटुंबे स्थलांतरीत होतात. या कुटुंबातील गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व शून्य ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या घटकाला अंगणवाडी सेवांतर्गत पुरक पोषण आहार, लसीकरण, वाढीची देखरेख या सेवा प्राधान्याने दिल्या जातात. त्याचबरोबर या लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासणी सुध्दा केली जाते. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी अत्यंत महत्वपूर्ण असल्याने गटस्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने वीटभट्टीनिहाय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून जिल्ह्यातील वीटभट्टीवरील लाभार्थीची आरोग्य तपासणी केली जात आहे.

नुकतेच ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, महिला बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे यांनी आरोग्य तपासणी कॅम्पला भेट देऊन वीटभट्टीवरील लाभार्थाशी संवाद साधला होता. या आरोग्य शिबिरात आतापर्यंत २८१ गरोदर माता, ३२४ स्तनदा माता, ४४८ किशोरवयीन मुली, व शून्य ते ६ वर्ष वयोगटातील ३३४६ लाभार्थाची आरोग्य तपासणी केल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास ) संतोष भोसले दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्थलांतरीत लाभार्थाची आरोग्य तपासणी सुरू करण्यात येत आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देखील ही आरोग्य तपासणी महत्वाची असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास प्रकल्प स्तरावर नियोजन आरोग्य तपासणी शिबीर सुरळीत पार पडत आहेत.
– संतोष भोसले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास