आशांच्या पदरी निराशाच;अशा वर्कर्सचा बेमुदत संप 

दिवसाला ८ ते १२ तास काम करून मिळते अवघे ३५ रुपये मानधन

Hope lessness; indefinite strike of such workers
 आशांच्या पदरी निराशाच;अशा वर्कर्सचा बेमुदत संप 
राज्यात कोरोना महामारी चे संकट कमी करण्यासाठी आणि कोरोनाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या, अशा वर्कर्सना त्यांच्या मोबदल्यासाठी झगडावे लागत आहे. त्यांचा मोबदला ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आशा वर्कर ना दररोज आठ ते बारा तास काम करून  दिवसाला फक्त 35 रुपये मोबदला मिळतो.  त्यासाठी योग्य तो मोबदला मिळवण्यासाठी आशा वर्कर्सनी  संप सुरू केला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याची भूमिका अशा वर्कर्सनी घेतली आहे. करोनामुळे सर्व जगच थांबले होते. कोरोनाची पहिली लाट त्या नंतर दुसरी लाट आणि त्याचे दुष्परिणाम त्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी यामुळे सर्वांच्या नाकीनऊ आली होती.
कोरोनाला रोखण्यासाठी सरकार बरोबर डॉक्टर ,नर्स ,आरोग्य विभागातील कर्मचारी खांद्याला खांदा लावत प्रयत्न करत होते. मुख्यमंत्र्यांनी माझे घर माझे कुटुंब ही स्पेशल योजना यासाठी  राबवली आणि ही योजना सफल ही झाली आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे आशा वर्कर्स यांचे कष्ट ,त्यांची मेहनत,  गावो गावी जाऊन  गल्ली बोळात जाऊन   करोना साठी आशा लोकांच्या घरोघरी जाऊन पल्स ऑक्सिमेटर, ताप मोजण्यापासून आरोग्याच्या वेगवेगळ्या नोंदी करतात. एका आशाला किमान ५० घर रोज करावी लागतात. याशिवाय आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरणापासून रुग्णतपासणीत मदत करावी लागते. शिवाय आरोग्य विभागाचे डॉक्टर सोपवतील ती कामे करावी लागतात. साधारणपणे ८ ते १२ तास काम करून घेतले जाते. त्याबद्दल महिन्याकाठी १ हजार रुपये म्हणजे रोज ३५ रुपये दिले जातात. नियमानुसार करोनापूर्व काळात आरोग्याचे काम आठवड्यातून चार दिवस व रोज दोन ते चार तास करणे बंधनकारक होते. करोना काळात आशा रोज ८ ते १२ तास काम करत असून राज्य सरकारचा आरोग्य विभाग यासाठी एक रुपयाही देत नाही.
जीवाची पर्वा न करता करोनाचे काम करणाऱ्या आशा व कुटुंबीयांना कोणतेही विमा कवच, आरोग्य संरक्षण नाही, आजारी पडल्यामुळे कामावर आले नाही तर मानधन कापले जाते. आशांना करोनाच्या कामाचे किमान १८ हजार रुपये मासिक मिळाले पाहिजे. आरोग्याची ठोक काळजी घेतली पाहिजे. करोनामुळे मृत्यू झाल्यास ठोक मदत व कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे हे तर झालेच नाही ,तर उलट करोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्क, हातमोजे, सॅनिटाइजर  आदी मिळाले. मात्र गेल्या वर्षभरात बहुतेक ठिकाणी काहीच दिले जात नव्हते तर काही ठिकाणी अर्धवट वस्तू देत होते. गेले वर्षभर करोनात जीवावर उदार होऊन काम करणार्या ७२ हजार आशा व गटप्रवर्तकांना राज्य सरकारने फुटकी कवडीही करोनाच्या कामापोटी दिलेली नाही.
केंद्र सरकारकडून करोना भत्ता म्हणून महिन्याला १ हजार रुपये म्हणजे प्रतिदिन ३५ रुपये दिले जातात. करोनाला रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबादारी ही योजना सफल करण्यात सर्वात मोठा वाटा आशा वर्कर्सचाच होता . असे असताना मात्र यांच्या आशा पूर्ण करण्यास सरकार अपयशी ठरलंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे योग्य मानधन मिळण्यासाठी आशांचा राज्यव्यापी संप सुरु करण्यात आला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हा बेमुदत संप सुरु राहणार आहे. मेस्मा किंवा कोणतीही सरकारी दहशत आता संप मोडू शकणार नाही अशा इशाराच आता आशा संघटना यांनी दिला आहे. अनेक घटकासाठी सरकार मदतीचा हाथ पुढे करते ,मग जी लोक करोना रोखण्याचे महत्वाचे काम आपली जीवाची पर्वा न करता करत आहेत त्यांच्यासाठी  मात्र सरकारकडून कसलीच मदत नाही.  ही एक मोठी शोकांतिकाच आहे.
“मी अनेक वर्षांपासून आशा वर्कर चे काम करते. मला दरमहा फक्त हजार रुपये  मिळतात . मला दोन लहान मुली आहेत ,एक मुलगी १२ वर्षाची तर एक मुलगी सहा वर्षाची. नवरा टेंम्पो चालक आहे त्याला ही किरकोळ पगार मिळतो.  काम करणे बंधनकारक असल्याने मी माझ्या लहान मुलीला सोबत ठेवते. आमचे फक्त एकच मागणी आहे की आम्हाला व्यवस्थित जगता येईल आणि कुटुंबाला पोसता येईल तेवढं सरकारने मानधन दिले पाहिजे. एवढीच अपेक्षा आहे.”
-मनीषा कांबळे (आशा वर्कर)
“महाराष्ट्रात 66 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गटप्रवर्तक यांनी कालपासून संप सुरू केला आहे. यासाठी उद्या महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठक आहे.  बैठकीत योग्य तो निर्णय होईल अशी आशा आहे.  जर बैठकीत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हा संप असाच सुरू ठेवणार आहोत.”
– एम. ए. पाटील (अध्यक्ष आशा कर्मचारी कृती समिती)