घरठाणेरस्ता रुंदीकरणातील बाधितांचे पुनर्वसन कधी

रस्ता रुंदीकरणातील बाधितांचे पुनर्वसन कधी

Subscribe

सन २००० मध्ये या रस्ता रुंदीकरणात २२ घरे तोडली. यातील कोणाचेही पुनर्वसन झाले नाही, गेली २१ वर्षे हे नागरिक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्त्यामधील बाधित रहिवासी आणि दुकानदार पुनर्वसन कृती समितीच्या माध्यमातून स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने हरकती, सूचना नोंदविण्याकरीता पालिका मुख्यालयात जमले होते. या बाधितांनी नव्या विकासकामांना विरोध केला.

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली नाका ते गणपती गणपती चौक, सिद्धार्थ नगर, म्हसोबा चौक ते तिसगाव नाका पर्यंत हा यु टाईप रस्ता असून वर्ष १९९५ ते २००० आणि २०१४ साली या रस्त्याचे १२ मीटर आणि १५ मीटर रुंदीकरण झाले आहे. असे असताना आता पुन्हा ऑक्टोबर २०२० च्या महासभेत २४ मीटर रस्ता रुंद करण्याचा ठराव करण्यात आला. यामध्ये १६०० घरे आणि दुकाने पूर्णपणे बाधित होत आहेत. सन २००० मध्ये या रस्ता रुंदीकरणात २२ घरे तोडली. यातील कोणाचेही पुनर्वसन झाले नाही, गेली २१ वर्षे हे नागरिक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

- Advertisement -

वर्ष २०१६ च्या महासभेत जोपर्यंत पुनर्वसनाचे धोरण आणत नाही तोपर्यत रस्ता रुंदीकरणाची प्रकिया करू नये असा ठराव केला. तरी सुद्धा या ठरावाल न जुमानता आॅक्टोबरच्या महासभेत हा ठराव मांडला. कल्याण पूर्वेतील नगरसेवकांनी हा ठराव न मांडता कल्याण पश्चिमेतील नगरसेवक प्रकाश पेणकर आणि डोंबिवलीतील नगरसेवक राहुल दामले यांनी हा ठराव भूमाफियांच्या फायद्यासाठी मांडला असल्याचा आरोप या बाधितांनी केला आहे.

पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी व्हावे याकरीता कोणतेच पुनर्वसन धोरण न आणता फेरबदल प्रस्ताव ठेवणे चुकीचे आहे. क्लस्टर सारखी योजना यू टाईप रस्ता आजूबाजूच्या भूखंडावर राबविल्यास आहे त्याच ठिकाणी संबंधितांचे पुनर्वसन करता येईल. त्यामुळे महापालिकेने त्वरीत क्लस्टर योजनेच्या दृष्टीने पावले उचलून, कोरोना काळात आणलेला फेरबदल प्रस्ताव मागे घ्यावा यासाठी एकूण ५०० हरकती मंगळवारी नोंदविण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

पुनर्वसन कृती समितीच्या शिष्टमंडळाने उपायुक्त उमाकांत गायकवाड यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष अॅड.उदय रसाळ, कार्याध्यक्ष विजय मोरे, सचिव दुर्गेश फडोळ, सदस्य संतोष बलवानी, दर्गे आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाने हरकती व सूचना देत क्लस्टर बाबतची सूचना त्यांना लक्षात आणून दिली. उपायुक्तांनी सर्व वृत्तान्त आयुक्तांना देवून लवकरच पुनर्वसन कृती समितीची बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

महापालिकेने आमच्या सूचना आणि हरकती लक्षात घेवून त्वरीत यू टाईप रस्ता फेरबदल प्रस्ताव मागे न घेतल्यास पुढे महापालिकेला घेराव घालून ठिय्या आंदोलन करण्यात येईल, तसेच मागण्यांसाठी न्यायालयीन लढा सुध्दा लढण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनाला दिला असल्याची माहिती पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष अॅड. उदय रसाळ यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -