ठाणेकरांनो, सावधान! शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट!

fake currency
बनावट नोटा

भारतीय चलनातील बनावट नोटांची छपाई चिपळूण येथे करून त्यांचे वाटप मात्र मुंबई-ठाण्यासारख्या शहरात करणाऱ्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला ठाण्याच्या गुन्हे शाखेने ठाण्यातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या टोळीजवळून २ हजाराच्या ८५ लाख किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखा वागळे इस्टेट यांनी बुधवारी केली आहे. सचिन आगरे (२९) , मन्सूर हुसेन शेख (४५) आणि चंद्रकांत माने (४५) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. सचिन आणि मन्सूर हे दोघे रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण येथे राहणारे असून चंद्रकांत हा मुंबईतील साकीनाका येथे येथे राहणारा आहे.

ठाण्यातील कापूरबावडी सर्कल या ठिकाणी काही इसम बनावट नोटांचे वितरण करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ५ वागळे इस्टेट युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सपोआ. किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. घोडके यांनी सापळा रचून सचिन आगरे याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याजवळील असलेल्या बॅगेची झडती घेण्यात आली असता त्यात २ हजार रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले. सचिनला चौकशीसाठी ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ असणाऱ्या नोटा बनावट असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

सचिनकडून जप्त करण्यात आलेल्या २ हजार किंमतीच्या बनावट नोटांची छपाई चिपळूण तालुक्यातील एका गावात करण्यात येत होती. दरम्यान, पोलिसांनी चिपळूण येथे छपाईखान्यावर छापा टाकून मन्सूर शेख आणि चंद्रकांत माने या दोघांना अटक करण्यात आली. या त्रिकुटाजवळून पोलिसांना दोन हजार रुपयांच्या ८५ लाख किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या असून प्रिंटिंग मशीन, पेपररिम्स, संगणक, इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. चंद्रकांत माने याने बनावट नोटा छापण्यासाठी आर्थिक मदत केली असून इतर दोघे या नोटा छापून खऱ्या नोटांच्या बंडलमध्ये बनावट नोटा टाकून त्या वितरित करीत होते.

मुंबई, ठाणे यासारख्या शहरांतील मुख्य बाजारपेठा आणि तेथील छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांना ही टोळी लक्ष करून बनावट नोटा खऱ्या असल्याच्या सांगून वितरित करीत होती अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली. या बनावट नोटांच्या व्यापारात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने तपास सुरु असल्याचे घोडके यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या तिघांना गुरुवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.