कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. आधीच रस्ते अरुंद,त्यातच रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे यातून वाट कशी काढावी ? हा प्रश्न केवळ वाहनचालकांनाच पडत नाही तर रस्त्यावरून चालणार्या पादचार्यांना देखील पडला आहे. स्मार्ट सिटी ठाकुर्लीतील म्हसोबनगर आणि चोळे गावामधून जाणार्या रस्त्यावर देखील जागोजागी प्रचंड असे खड्डे पडल्याने संतप्त ठाकुर्लीकरांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध नोंदविला. स्मार्ट सिटी कल्याण डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसर खर्या अर्थाने स्मार्ट सिटी वाटते. कारण याच ठाकुर्लीतून कल्याण डोंबिवलीला जोडणारा 90 फुटी समांतर रोड जातो. चारपदरी असलेल्या या रस्त्यावर रोड डिव्हायडर मध्ये सुंदर अशी पाम वृक्ष आहेत. रस्त्याच्या दुतर्फा प्रशस्त पदपथ आणि पथदिवे लावण्यात आले आहेत. त्याच रस्त्याच्या किनारी विविध वृक्ष आहेत. रेल्वे समांतर असलेल्या या रस्त्यावरील भिंतींवर विविध रंगातील चित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे हा भाग खरोखरंच स्मार्ट सिटी असल्याचे वाटते. मात्र आता त्याच 90 फुटी रस्त्यावर यंदा स्मार्ट खड्डे पडले आहेत.
चोळेगाव रस्त्याचे चौदा जून रोजी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र सालाबाद प्रमाणे मागील आठवड्यापासून कोसळत असलेल्या संततधार पावसाने जागोजागी खड्डे पडून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदाराविरोधात केडीएमसी प्रशासनाने कोणतीही कारवाई केल्याचे वृत्त नाही. आता जीवघेण्या खड्ड्यांतून जाताना वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे.
कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत एकाचा बळी गेला असून दोन जण जखमी झाले आहेत. प्रशासनाला जागे करण्यासाठी ठाकुर्लीकर स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नागरिकांनी सह्यांची मोहिमही राबविली. प्रशासनाने या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून दुरवस्था संपुष्टात आणली नाही तर मात्र या पुढे मोठे आंदोलन करू, असाही इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत आंदोलनकर्त्यांना अटकाव केला. कोणतीही पूर्वकल्पना न देता, परवानगी न घेता रस्त्यावर उतरून आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. आपली समस्या संबंधित प्रशासनाला भेटून सांगा, असा सल्ला यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना दिला.