नवी मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवत नवी मुंबईतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी तसेच समाजवादी पार्टी, मुस्लिम समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ति आणि आंबेडकरवादी नेत्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ मधील एका कार्यक्रम सोहळ्यात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आयोजित जाहीर पक्ष प्रवेशात उपनेते विजय नाहटा यांनी विविध पक्षातील शेकडोंच्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. नवी मुंबईत सुमारे 45 नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मूळ शिवसेनेत आले असल्याने खरी शिवसेना आमचीच असल्याचे उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले. नवी मुंबईतील ठाकरे गटात अनेक जण खंडणीखोर असल्याचा आरोप नाहटा यांनी केला. तसेच इतर अनेक जणही ठाकरे गटातून खर्या शिवसेनेत शिंदे यांच्यासोबत येण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, त्यामुळे नवी मुंबई ‘शिल्लक सेना’ अस्तित्वात राहाणार नाही, असेही नाहटा सांगितले.
यावेळी उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले की, ‘आपण दुर्बल, वंचित आणि गरजवंताच्या मदतीला धावून आलो.आपल्याकडे येणार्या प्रत्येक गरजूंना जात, पात, धर्माच्या पलिकडे जाऊन मदत केली. आपल्या बुद्धीचा आणि अनुभवाचा उपयोग समाजातील गरजू, विद्यार्थी, तसेच महिला आणि उपेक्षित घटकांच्या विकासासाठी करत आहोत, त्यासाठी शिवसेना दिवसरात्र काम करत आहे. ठाकरे गटातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका पाहिला आणि आठ दिवसात पक्ष प्रवेश केला, उशिरा का होईना, मूळ शिवसेनेत आपण सर्वजण आला आहात,
आता मनामध्ये कोणतीही शंका- कुशंका न ठेवता आपण लोकांची सेवा करावी, त्यासाठी माझे सर्वप्रकारे सहकार्य राहील, ’ असे आश्वासन नाहटा यांनी यावेळी दिले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना महिला जिल्हा संघटक सरोज रोहिदास पाटील, उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, नवी मुंबई शहर प्रमुख विजय माने, उत्तर भारतीय सेना अध्यक्ष कमलेश वर्मा, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सलीम मुल्ला, एम. एच. खान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सानपाडा येथील उपशहर प्रमुख शिरीष पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ साळवी यांच्या समावेत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यावेळी विजय नाहटा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्यांना पक्षातील महत्वाची जबाबदारी देत नियुक्ती पत्रे दिली. हा पक्ष प्रवेश सोहळा यशस्वी करण्यासाठी विजय माने, दिलीप घोडेकर, संजय भोसले, मिलिंद सूर्यराव यांनी सहकार्य केले.