शहापुरातील जंगलात वणवा

आगीत दोन आदिवासी महिलांसह बैल होरपळून जखमी

एकिकडे ठाणे जिल्ह्यातील जंगलात पेटविल्या जाणाऱ्या वणव्यांत शेकडो हेक्टर मौल्यवान वनसंपदा जळून नष्ट होत आहे तर जंगलातील वाढत्या वणव्याच्या घटनांत वन्यजीवांचा अधिवास देखील धोक्यात सापडला आहे. असे असतानाच या वणव्यांच्या वाढत्या घटना वनविभागाला रोखण्यात सपशेल अपयश आल्याचे वास्तव समोर येत आहे. दुसरीकडे हे वणवे आता मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब आदिवासींच्या देखील मुळावर उठले आहेत. जंगलातील पेटत्या वणव्याच्या आगीचे लोट शेतात आल्याने ही आग विझविण्यासाठी पुढे सरसावलेल्या एका आदिवासी कुटुंबातील दोन महिला अगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने वणव्याच्या आगीत गंभीररित्या भाजून जखमी झाल्याची दुर्दैवी अशी घटना शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या अजनुप गायदारा परिसरात घडली आहे.

आगीत भाजल्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत या दोन्ही महिलांवर शहापूर येथील लाईफ लाईन या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या वणव्यात एक बैल देखील भाजून जखमी झाले आहे. या घटनेमुळे तालुक्यातील आदिवासींमध्ये एकच घबराट पसरली आहे.या घटनेचा मात्र थांगपत्ताही स्थानिक वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी वन कर्मचाऱ्यांना नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत असून आदिवासी समाजात संतापाची एकच लाट पसरली आहे.

शनिवारी दुपारच्या सुमारास शिरोळ जवळील अजनुप गायदारा परिसरातील मोलमजुरी करणारी बुधी जानू वाख (६५ ) ही वृद्ध आदिवासी महिला आपला मुलगा देवराम (३२ ) सून वनिता (२८) नात कांता (१७) या कुटुंबासह आपल्या शेतावर काम करीत असताना अचानक शेत जमीनी लगतच असलेल्या वनविभागाच्या राखीव जंगलात एक भला मोठा वणवा पेटला.

हळूहळू या जंगलातील वणव्याची आगचे लोट बुधी वाख यांच्या शेतात घुसले आगीत गवत पेटू लागल्याने आगीचे उग्र रुप पाहता आगीतून आपला जीव वाचविण्यासाठी वणव्याची लागलेली आग विझविण्यासाठी बुधी वाख ही वृद्ध महिला पुढे सरसावली. मात्र वणव्याच्या भडकलेल्या आगीत सापडून बुधी या आगीमध्ये होरपळून गेल्याने गंभीर भाजल्या. तथापि आपल्या सासूला या घटनेतून वाचवण्यासाठी वनिता ही महिला पुढे धावत आली. पण तिही वणव्याच्या आगीच्या भडक्यात सापडली आणि तीपण या आगीत भाजून गंभीर जखमी झाली. या वणव्याच्या आगीतून जखमी अवस्थेतच आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत वणव्यातून आपली कशीबशी सुटका करीत या दोन्ही महिला वेळीच बाहेर पडल्याने या महिलांचा सुदैवाने या घटनेतून जीव वाचला आहे. याचवेळी घटनास्थळावरून प्रसंगवधान राखत देवराम हा देखील आपल्या सतरा वर्षीय कांता या लहान लेकीसह सुरक्षित स्थळी पळाल्याने तो या घटनेतून वाचला आहे. या दोन्ही महिलांना प्रथम खर्डी उपकेंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले असता आगीत जास्त प्रमाणात भाजल्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत या दोन्ही महिलांना पुढील उपचारासाठी शहापूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

साधारण या आगीच्या घटनेत दोन्ही महिलांचे हात व पाय भाजले असून आगीच्या घटनेत दोन्ही महिला चाळीस टक्के भाजून गंभीररित्या जखमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये या जखमी महिलांची तब्येतीची विचारपूस केली आहे. दरम्यान या आगीच्या घटनेत घटनास्थळावर खर्डी वनपरिक्षेत्रातील जवळजवळ अर्धा हेक्टर क्षेत्र तर मालकी क्षेत्रातील वीस हेक्टर क्षेत्र जळून बेचिराख झाले आहे. असे शहापूर उपवनसंरक्षक वसंत घुले यांनी माहिती देताना सांगितले.

वणव्याच्या आगीत भाजून दोन महिला जखमी होणे ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना असून वनविभाग व तहसीलदार यांनी तत्काळ या दोन्ही महिलांना नैसर्गिक आपत्ती मधून शासकीय आर्थिक मदत जाहीर करावी.
– पांडुरंग बरोरा, माजी आमदार शहापूर विधानसभा क्षेत्र

वणव्यात भाजून जखमी झालेल्या महिलांना नैसर्गिक आपत्ती म्हणून मदत मिळू शकते. परंतु
वनविभागाकडे मदतीसाठी अशी कोणत्याही प्रकारे शासकीय निधीची तरतूद आमच्याकडे नाही.
– वसंत घुले उपवनसंरक्षक शहापूर

शहापुरात वणव्याच्या दोन महिन्यांत २९ घटना
शहापूर प्रादेशिक विभागाच्या ६ वनपरिक्षेत्रातील जंगलात गेल्या दोन महिन्यात एकूण २९ ठिकाणी वणवे पेटविण्याच्या घटना घडल्याची शासकीय नोंद शहापूर उपवनसंरक्षक कार्यालयाच्या दफ्तरी आहे. वणव्याच्या वाढत्या घटनांमध्ये जवळपास २५ हेक्टर क्षेत्रातील वनसंपदा जळून नष्ट झाली असून या आगीमुळे वन्यजीवांचा अधिवास हा धोक्यात सापडला असून आगीत दुर्मिळ उभयचर प्राणी देखील भक्ष्यस्थानी सापडले आहेत.