पत्नीचा नको त्या अवस्थेतील व्हायरल व्हिडिओ बघून रागात पतीने केली हत्या!

wife murder husband kelwad in nagpur

पत्नीचे परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत असलेले व्हायरल झालेले व्हिडिओ बघून संतापलेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नीच्या हत्येची कबुली दिल्याचा खळबळजनक प्रकार भिवंडीतील शांतीनगर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

WhatsApp वर झाला व्हिडिओ व्हायरल

मोहम्मद रफिक युनूस खान (५०)असे या पतीचे नाव आहे. भिवंडीतील अन्सार नगर येथे पत्नी नसरीन (३८) सोबत तो राहात होता. नसरीनचे त्याच परिसरात राहणाऱ्या सद्दाम नावाच्या परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पती मोहम्मद रफिकला होता. परंतु हाती काही पुरावा नसल्यामुळे मोहम्मद रफिकने याबाबत कधीही पत्नीकडे चर्चा केली नाही. मात्र, बुधवारी अचानक मोहम्मद रफिकच्या मोबाईल फोनच्या Whatsapp वर व्हायरल होऊन आलेला व्हिडीओ बघताच त्याला धक्का बसला. व्हिडीओमध्ये पत्नीला एका परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत बघून मोहम्मद रफिक भयंकर संतापला होता. त्यातच हा व्हिडीओ संपूर्ण परिसरात व्हायरल झाल्यामुळे त्याची अब्रू गेली होती.

व्हिडिओतील व्यक्तीचा शोध सुरू

दिवसभर लोकांच्या तोंडी व्हिडीओची चर्चा ऐकून रात्री घरी आलेल्या मोहम्मद रफिकने धारदार शस्त्राने पत्नीची निर्घृण हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर मृतदेह तसाच टाकून मोहम्मद रफिक हा शांती नगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला आणि त्याने पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली. मोहम्मदला ताब्यात घेऊन घटनेची खातरजमा करून पोलिसांनी पती मोहम्मद रफिक याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली, अशी माहिती शांती नगर पोलिसांनी दिली. तसेच मोहम्मद रफिक याच्या पत्नीसोबत व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा देखील शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.