Homeठाणेमुरबाड तालुक्यातील खेवारे गावात आदर्श पर्जन्य जलसंधारण

मुरबाड तालुक्यातील खेवारे गावात आदर्श पर्जन्य जलसंधारण

Subscribe

दोनशे एकर कोरडवाहू जमीन येणार ओलिताखाली

मुरबाड । तालुक्यातील खेवारे गावात वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे या संस्थेकडून उभारण्यात आलेल्या ‘आरव जलसिंचन प्रकल्पाचे’ पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. शेतीसाठी पाणी हे मुख्य उद्दिष्ट ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासाचे प्रारूप तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. दोन वर्षांपूर्वी सरकार आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून मुरबाड तालुक्यातील खेवारे गावात सुरू करण्यात आलेल्या आरव जलसिंचन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. पर्जन्य जलसंधारण संकल्पनेवर आधारित या प्रकल्पातून साडेसात कोटी लिटर पाणी अडवले जाणार आहे. त्यातून सुमारे 200 एकर कोरडवाहू शेती ओलिताखाली येणार आहे.

राज्यात विविध भागांत सध्या पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात सामाजिक संस्थांच्या मदतीने बंधारे बांधत पाणी अडवून भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातही असे प्रयोग सुरू असून यातूनच आंतरराष्ट्रीय जलदिनी वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे यांनी उभारलेल्या मुरबाड तालुक्यातील खेवारे येथे आरव जलसिंचन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. शेतीसाठी पाणी हे मुख्य उद्दिष्ट ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासाचेप्रारूप तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. आजवर पाणी वहनाचे डॉ. कालबार आयआयटी पवई यांचे शाफ्ट तंत्र, तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी यांनी सौरऊर्जा पंप, महिंद्रा फायनान्स, नाम फाऊंडेशन, घरडा केमिकल्स या कंपन्यांच्या सामजिक उत्तरदायित्व निधीतून आणि विश्वजीत नामजोशी, प्रकाश पाटील यांच्या अर्थसाह्याने तसेच स्थानिक लोकसहभागातून शेततळ्यांचे खोदकाम, अस्तरीकरण, जाळीचे कुंपण, साडेसात किलोमीटर 110 मिलीमीटर जलवाहिनी 30 एकर साठी ठिबक सिंचन संच उपलब्ध करून देण्यात आले. पावसाळ्यात खेवारे शेत शिवारात पडणार्‍या पावसाच्या पाण्यातून साडेसात कोटी लिटर पाणी शेततलावात अडवले जाईल. अशा प्रकारे समुद्रात वाहून जाणार्‍या पावसाच्या पाण्याचे अभिनव प्रकारे संधारण होईल. पावसाळ्यात साठवलेल्या या पाण्यातून आणि उन्हाळ्यात तलावातून शाफ्टद्वारे येणार्‍या पाण्यातून 200 एकर जमीन ओलिताखाली आणली जाईल. या प्रसंगी वसुंधरा संजीवनी मंडळाचे आनंद भागवत, महिंद्र फायनान्सच्या नीलिमा दळवी, मिलिंद केळकर, विश्वजीत नामजोशी, आनंद राऊळ उपस्थित होते. प्रत्येक शेततळ्यासाठी जागा देणार्‍या 20 शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेने केलेल्याआवाहनाला ग्रामस्थांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा प्रकल्प उभा राहिला. सर्व समस्यांचे मूळ पाणी प्रश्नात असून तो सोडवण्यात आला आहे.
-आनंद भागवत, वसुंधरा संजीवनी मंडळ, ठाणे

1972 पासून तलावात पाणी पडून होते. दुसरीकडे माळरान उजाड होते. आज भेंडी, काकडी उत्पन्न घेताना खूप आनंद आहे.
-जयवंत भोडीवले, शेतकरी