ठाणे : जितोला कॅन्सर युनिट देण्यात आले, करोडो रुपयांच्या जमिनीचा ताबा आरोग्य व्यवस्थेच्या नावाखाली देण्यात आला, त्यातील काही कोटी रूपये जर छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाला (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) दिले असते तर, अनेक गरिबांचे जीव वाचतील आणि आपल्या पदरात पुण्य पडेल. शहरातील रंगरंगोटी आणि लायटींगवर खर्च करून शहर स्मार्ट होणार नाही. त्यासाठी शहराची आरोग्य व्यवस्थाही सक्षम करावी लागते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लगावला. तसेच 30 टक्के कमिशनच्या हव्यासापोटी अनेक तपासण्या करण्यासाठी रूग्णांना बाहेर पाठवण्यात येते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. (If a few crores are given to this hospital the lives of the poor will be saved Jitendra Awada challenged the Chief Minister)
हेही वाचा – बालमृत्यूत मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आघाडीवर; 16 जिल्ह्यांत साडेचार वर्षांत 6 हजार मृत्यूंची नोंद
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दररोज शेकडो रुग्णांची वर्दळ असलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनागोंदी माजली आहे. बेड नसल्याचे कारण सांगून रूग्णांना दाखल करून घेतले जात नाही. परिणामी दूरवरून आलेल्या रुग्णांवर उपचार होतच नाहीत. गुरूवारीही (10 ऑगस्ट) तसाच प्रकार सुरू असल्याची माहिती येथे उपचारासाठी आलेल्या रूग्णांनी जितेंद्र आव्हाड यांना फोनवरून दिली. ही माहिती मिळताच जितेंद्र आव्हाड यांनी तडक छत्रपती शिवाजीमहाराज रूग्णालय गाठून पाहणी केली होती. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी व्यवस्थापनावर चांगलीच आगपाखड केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आदी उपस्थित होते.
आव्हाड म्हणाले की, गेली तीस वर्षे जे ठाणे महानगर पालिकेच्या सभागृहामध्ये सत्तेत बसले आहेत, त्यांनी काय केले? असा आपला सवाल आहे. गुरूवारी रात्री आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात गेलो. तेव्हा, रूग्णालयात कुत्रे फिरताना दिसत होते. या कुत्र्यांनी रूग्णालयात शी केलेली, सु केलेली दिसत होती. रूग्णांना बाहेर बसण्यासाठी जे कठडे तयार केले आहेत. त्यावरही रूग्ण झोपले होते. त्यावर झोपलेल्या एका रुग्णाने आपल्याकडे 12 तास कोणीही लक्ष दिलेले नाही, असे सांगितले. डाॅक्टरांशी रुग्णाने संवाद साधल्यावर आता वेळ नाही, उद्या ये असे सांगितले जाते. मृत्यू हा सांगून येत नाही. त्यामुळेच डाॅक्टर्सची उपलब्धता 24 तास असावी, असा अलिखित नियम आहे. पण, इथे सर्व बोंबाबोंब आहे.
हेही वाचा – Thane मनपा रुग्णालयात अनागोंदी कारभार, एकाच दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू
छत्रपती शिवाजीमहाराज रूग्णालयात पंख्याखाली बेड देण्यासाठी चक्क 500 रूपये मागितले जात आहेत. या रूग्णालयात उपचारासाठी गोरगरीब, मागासवर्गीय रूग्ण जात असतात. त्यांचा अप्रत्यक्ष छळच केला जात आहे. ठाणे शहर स्मार्ट केले जात आहे. शहरात ठिकठिकाणी रंगरंगोटी, लाईटींग केली जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जात आहे. त्यापेक्षा इथल्या गरिब रूग्णांच्या जीवाशी खेळ होऊ नये, म्हणून त्या पैशाचा वापर आरोग्य सुविधांसाठी केला गेला तर, ठाणेकर आयुष्यभर आपले उपकार मानतील, असा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. रूग्णालयात जेवणासाठीही रूग्णांना घरातून वाडगे आणायला सांगितले जाते. पोषक आहार म्हणून मनोरुग्णालयात अंडी देण्यात येत असतात. इथे कोंबडीच अंडी घेऊन जाते की काय? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. 30 टक्के कमीशन मिळवण्यासाठी रक्त, लघवी, विष्ठा बाहेरून तपासून आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते.
हेही वाचा – ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ भागात होणार 5० टक्के पाणीपुरवठा
आपण सन 2014 मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना हे रूग्णालय शासनाकडे वर्ग करावे, असे सुचवले होते. कारण, आज सायन, केईएम, नायर आणि जेजे या रूग्णालयात उत्कृष्ट सेवा मिळत आहे. त्यामागे शासनाची यंत्रणाच महत्वपूर्ण ठरत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या प्रस्तावास अनुकूलता दर्शविली होती. पण, तो प्रस्ताव पुढे सरकलाच नाही. आजची या रुग्णालयाची अवस्था पाहून असे वाटते की, गरिबांना जगण्याचा अधिकार नाही का? गरिबांना उत्तम आरोग्य व्यवस्था मिळवण्याचा अधिकार नाही का? येथील सुतिकागृहात गरोदर महिला खुर्चीवर बसलेल्या असतात. तिथेच रक्तस्राव होऊन अनेक गर्भवती दगावतात. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना आपण हात जोडून विनंती करतो की, आपण आपल्या शहराचे उत्तरदायित्व म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे.
हेही वाचा – कळवा रुग्णालयात ‘गब्बर इज बॅक’, मृतावर सुरू होते पाच तास उपचार!
यामध्ये मला राजकारण करायचे नाही. पण, एवढेच सांगायचे आहे की, जितोला कॅन्सर युनिट आणि करोडो रुपयांच्या जमिनीचा ताबा दिली आहे, त्यातील काही करोडो रुपये जर कळवा हॉस्पिटलमध्ये दिले तर, अनेक गरिबांचे जीव वाचतील आणि आपल्या पदरात पुण्य पडेल. चुकीच्या माणसांच्या हातात रूग्णालय आणि परिवहन सेवा गेल्याने ही दुर्दशा झाली आहे. गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात गेलो. तेव्हा परिस्थिती पाहून माझा संताप अनावर झाला होता. मी ते बोलूनही दाखवले. मात्र, आपलं चिडणं स्वाभाविक होते. तिथे माझे आई-वडील, पोरं बाळ तिथे ऍडमिट नाहीत. जर गरिबांसाठी माझा जीव तुटत नसेल गरिबांसाठी मी चिडत नसेल तर मला जगण्याचा अधिकार नाही, असेही आव्हाड म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी जीवघेणी रिस्क घेऊन नये
दरम्यान, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास करू नये. हा साधारण जगभरातला अलिखित नियम आहे. हवामान खराब असल्यानेच आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री वैयक्तिकरित्या ‘मुख्यमंत्री’ म्हणून माझ्याशी कसेही वागत असोत, ती त्यांची राजकीय भूमिका आहे. पण, ते आधी माझे मित्र होते. त्यांनी हवामान खात्याचा हिरवा कंदील नसताना हेलिकॉप्टर उडवू नये. ते जीवघेणे ठरू शकते. मी त्यांना एवढीच विनंती करतो की, तुम्ही अशी रिस्क घेत जाऊ नका. शेवटी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. मुख्यमंत्री ज्या मार्गाने साताराकडे गेले. त्या मार्गात सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. जर धुक्यामुळे डोंगररांग दिसली नाही तर, अनर्थ घडू शकतो. म्हणू त्यांनी अशी कृती करू नये, अशी माझी विनंती आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.