बदलापुरात तडीपार गुंडाचा हातात तलवार घेऊन धिंगाणा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बदलापूर : शहरात बुधवारी एका तडीपार गुंडाने हाती तलवार घेऊन धिंगाणा घातला. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र बदलापूर पश्चिम पोलिसांनी लगेच हातलचाल करत या गुंडाला बेड्या ठोकल्या.

भर बाजारात हत्यारे घेऊन गुंड फिरत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळत आहे. अनेक तरुण हातात तलवार, चाकू, गावठी कट्टे, पिस्तूल जवळ ठेवून मोठेपणा गाजवण्याचा प्रयत्न करतात. सोबतच या हत्यारांद्वारे दहशत पसरवण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. पुण्यातही कोयता गँगची अशीच दहशत आहे. बदलापूर शहरात असे प्रकार अनेक वेळा पाहायला मिळतात. पोलिसांना मात्र याचा थांगपत्ताच नसतो. त्यामुळे अशा गुंडांना मोकळे रान मिळते.

आकाश धेंडे हा गुंड बुधवारी बदलापूर शहरातील पश्चिम भागात उड्डाणपूल परिसरात हातात तलवार घेऊन फिरत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काही अघटित घडू नये, याची खबरदारी म्हणून शहरातील सुज्ञ नागरिकांनी या संपूर्ण प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आकाश धेंडे याला ताब्यात घेतले. आकाश धेंडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे असल्याने त्याला तडीपार करण्यात आले होते.

होळीचा कार्यक्रम पाहण्यावरून दोन गटांत हाणामारी
बदलापुरमध्ये होळीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर पूर्व परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ही घटना घडली. सम्राट अशोक नगरमधील काही तरुण छत्रपती शिवाजी महाराज चौकात होळी पाहण्यासाठी आले होते. यावेळी त्यांची आपापसात मस्करी सुरू असताना, शेजारी उभ्या असलेल्या एका तरुणाने आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवीगाळ करत त्यांना डिवचले. त्यातून वाद निर्माण होऊन दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात आदित्य धनगर, प्रफुल्ल धनगर, आर्यन अमोल राऊत हे तरुण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ज्ञानेश्वर भोसले, शिरीष (बाळा) लाड, राजेंद्र लाड या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ पोलीस, निरीक्षक विक्रमसिंग कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी वाय कदम, पुढील तपास करत आहेत.