घरठाणेभिवंडी महानगरपालिकेत कालबाह्य बदल्यांमुळे नागरिकांची कामांना विलंब

भिवंडी महानगरपालिकेत कालबाह्य बदल्यांमुळे नागरिकांची कामांना विलंब

Subscribe
शासनाच्या प्रशासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची साधारणतः तीन वर्षांमध्ये बदली होते. मात्र भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा गेल्या काही वर्षांपासून सावळा गोंधळ सुरु असून मुदतीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु आहे. त्याचबरोबर नवीन नियुक्ती करताना सेवाजेष्ठता अथवा त्याच्या मूळपदाचा देखील विचार केला जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या कामाला विलंब होत असून प्रशासकीय पातळीवरील महत्वाची धोरणात्मक कामे रखडली आहेत. 
 भिवंडी महानगरपालिकेच्या आस्थापना विभागामार्फत प्रत्येक प्रभागातील आणि मुख्य कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तीन वर्षानंतर बदली होणे अपेक्षित आहे. मात्र अशा बदल्यांचे प्रमाण कमी असून मर्जीतील लोकांना कायम तेथेच ठेवण्यात आले आहे. भिवंडी महानगरपालिकेचे पाच प्रभाग असून त्या ठिकाणी प्रभारी प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्त केलेले कर्मचारी सफाई कामगार अथवा लिपिक असल्याचे आढळून येतात. पालिकेच्या कामाच्या हेतूने अशी नेमणूक केल्याचे उत्तर नेहमी प्रशासनाकडून दिले जाते. गेल्या काही वर्षांपासून अशा जबाबदारीच्या पदावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांची ४ ते ८ महिन्यात बदली केली जाते. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांचा जोर वाढला आहे. तर धोकादायक इमारती पडण्यासाठी वल्गना केल्या जातात. परंतु अशा धोकादायक आणि अनधिकृत बांधकामाच्या इमारती पाडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कारवाई होऊ नये म्हणून प्रभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या जात आहेत काय? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. 
प्रभाग समिती कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलेले सुदाम जाधव यांना सुरक्षा रक्षक अधिकारी पदी बसविले ठेवले होते. प्रभाग समिती १ चे अधिकारी दिलीप खाने यांची निवृत्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी सुदाम जाधव यांची सहा. आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे. प्रभाग समिती ३ मधील रमेश थोरात यांच्या जागी सोमनाथ सोष्टे यांची नियुक्ती केली आहे. सहा.आयुक्त बाळाराम जाधव यांची बदली आस्थापना विभागात करून त्यांच्या जागी निवडणूक विभागाचे गिरीश घोष्टेकर यांची नियुक्ती केली. सहा.आयुक्त राजू वरळीकर यांच्या जागी विधी अधिकारी अनिल प्रधान यांची नियुक्ती झाली आहे. वास्तविक अनिल प्रधान हे मनपाचे सचिव असून ते विधी अधिकारी म्हणून काम करीत आहेत. ते नेहमी कोर्टाच्या कामात व्यस्त असताना त्यांची प्रभाग कार्यालयात सहा.आयुक्त म्हणून बदली झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व बदल्या आयुक्तांच्या आदेशाने अल्पावधीत झाल्याने प्रभाग समितीमधील नागरिकांच्या समस्या कायम राहिल्या आहेत. तर धोकादायक इमारती आणि अनधिकृत बांधकामाच्या कारवाईचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही.सध्या महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरु आहे. असे असताना बाह्य शक्तीच्या दबावाखाली ह्या बदल्या केल्या जात आहे की काय? असा संशय नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
 या प्रकरणी मनपा आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ हे गेल्या तीन दिवसांपासून मनपा कार्यालयात व कार्यालयाबाहेरील शासकीय मिटींगमध्ये व्यस्त असल्याने नागरिकांना व पत्रकारांना भेटले नाहीत. तर आयुक्तांनी बदलीचे आदेश दिल्यांनतर त्यांचे आदेश बजावले जातात,अशी माहिती आस्थापना प्रमुख बाळाराम जाधव यांनी दिली. 
 
 

 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -