डोंबिवलीत 319 ठेवीदारांची पावणे दोन कोटींची फसवणूक

मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

In 8 years service police earned 22 lakhs of black maney

कल्याण डोंबिवली परिसरातील ठेवीदारांना आकर्षक व्याजाचे आमीष दाखवून एका खासगी म्युच्युअल फंड कंपनीने 319 ठेवीदारांची एक कोटी 77 लाख 89 हजार 934 रुपयांची फसवणूक केली आहे. वाढीव व्याज नाहीच, मूळ रक्कमही परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ठेवीदारांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी कंपनीच्या सहा संचालकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण पश्चिमेतील चिकणघर भागात राहणारे दंत चिकित्सक डॉ. आशीष शंकर रंदये (34) असे तक्रार करणार्‍या डॉक्टरचे नाव आहे. शंकर सिंग, सुनील गणेश विश्वकर्मा, कृपाशंकर पांडे, रामअवध वर्मा, राकेश दिवाकर, लालबहादुर वर्मा अशी आरोपींची नावे आहेत. जानेवारी 2019 ते मार्च 2022 या कालावधीत आरोपींनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. मानपाडा पोलिसांनी सांगितले, तक्रारीतील सहा आरोपींनी संगनमत करून ठेवीदारांची लुबाडणूक करण्याच्या इराद्याने मे. सुप्रीम म्युच्युअल बेनिफिट निधी कंपनीची स्थापना केली. या कंपनीला गुंतवणूकदार मिळवून देण्यासाठी 22 मध्यस्थ नियुक्त केले. या दलाल आणि कंपनी संचालकांनी संगनमत करून डोंबिवली, कल्याण परिसरातील नागरिकांना आपल्या ओळखीने संपर्क करून आपल्या म्युच्युअल फंड कंपनीत गुंतवणूक केली तर वार्षिक साडे अकरा टक्के व्याज देण्यात येईल असे आमीष दाखविण्यास सुरुवात केली.

आकर्षक व्याजाला भुलून अनेक गुंतवणूकदारांनी आवर्त ठेव, कायम ठेव योजनेतून पाच हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांची रक्कम सुप्रीम म्युच्युअल फंड कंपनीत मध्यस्थांवर विश्वास ठेऊन गुंतवली. ठेवीची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी वाढीव व्याजासह मूळ गुंतवणुकीची मागणी सुरू केली. त्यांना कंपनी संचालक, मध्यस्थांनी आर्थिक अडचण सांगून गुंतवणूक परत देण्याचे आश्वासन वेळोवेळी देऊन दिवस लांबविण्याचे काम केले. तीन वर्षाच्या कालावधीत मागणी करून व्याज नाहीच पण मूळ रक्कमही सुप्रीम कंपनीकडून परत केली जात नाही. मध्यस्थांकडून नंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येऊ लागली. संचालक, मध्यस्थांनी मोबाईल फोन बंद केले.

आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. कल्याणमधील दंतचिकित्सकाचीही यामध्ये फसवणूक झाल्याने त्यांच्या पुढाकाराने गुंतवणूकदारांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.