भर पावसात महापालिका आयुक्तांनी पाणी साचणाऱ्या सखल भागांची केली पाहणी

पाणी साचून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या दिल्या सूचना

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यात शहरात सखल भागात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी ठिकठिकाणी  पंप बसविण्यात आले असून आज भर पावसात महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी विविध ठिकाणांची पाहणी केली. यावेळी पाणी साचून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. शहरातील सखल भागात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी पंप बसविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते, त्यानुसार आपत्कालिन विभागाच्या वतीने शहरात विविध ३५ ठिकाणी साईट पंप तसेच पोर्टेबल पंप बसविण्यात आले आहेत.
गुरुवारी दिवसभर सुरू असणाऱ्या मुसळधार पावसात महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी देबनार सोसायटी, वंदना बस डेपो, चिखलकर वाडी,  सिडको बस स्टॉप, वृंदावन सोसायटी आदी ठिकाणांची पाहणी केली. यावेळी बोलताना महापालिका आयुक्त म्हणाले की, ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी पंप लावण्यात आले असून प्रशासनाच्यावतीने वेळोवेळी या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोठेही जास्त पाणी साचलेले नसून सर्व पंप सर्व पंप उत्तमरीत्या काम करत आहेत.
दरम्यान अतिवृष्टीच्या काळात ठाणे महानगरपालिका हद्दीतील विविध भागात पाणी साचल्यास नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टोल फ्री – १८०० २२२ १०८,  हेल्पलाईन – ०२२ २५३७१०१० व ७५०६९४६१५५, ८६५७८८७१०१ व ८६५७८८७१०२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त जी जी गोदेपुरे, उप आयुक्त शंकर पाटोळे, उप नगर अभियंता गुणवंत झांबरे, माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, सहाय्यक आयुक्त अजय ऐडके, कार्यकारी अभियंता प्रशांत फाटक आदी उपस्थित होते.