घरठाणेशिंदे की ठाकरे? हाच पेच आहे

शिंदे की ठाकरे? हाच पेच आहे

Subscribe

नगरसेवकांचे तळ्यात मळ्यात शिवसैनिक मात्र ‘मातोश्री’ सोबत

शिवसेनेच्या अंतर्गत फाटाफुटीला आमदारांपासून सुरुवात झाली. या कलहाचा फटका दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बसला. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाणे नवी मुंबई बरोबरच आता कल्याण डोंबिवली मधील ४० सीटिंग लोकप्रतिनिधींनी देखील गुरुवारी उशिरा नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पक्षप्रमुखांना चपराक लगावली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मागील पालिका निवडणुकीत ५३ नगरसेवक निवडून आणण्याचे श्रेय एकनाथ शिंदे यांना दिले जाते. शिंदे यांच्या निर्णयातून महापौर देखील केला जात असल्याचे बोलले जात आहे. ठाणे ,नवी मुंबई महानगरपालिका पाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिकेतील ४० सिटिंग नगरसेवक एका मोबाईल कॉलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावर गेले असल्याचे एकंदरीत चर्चा आहे.

- Advertisement -

कोण कोणासोबत?
कल्याण पूर्वेत काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ गेले असून निष्ठावंत शिवसैनिक, पदाधिकारी मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत. अशी माहिती पूर्वेतील शिवसेनेचे सक्रिय पदाधिकारी यांनी दिली.
मांडा टिटवाळा येथील कल्याण पश्चिमचे उपशहर प्रमुख किशोर शुक्ला यांनी सांगितले की मी झेंडा कधी उतरविला नाही. आम्ही शिवसेनेसोबत असून उद्धव ठाकरे हेच आमचे नेते असल्याचे सांगितले.

अटाळी येथील माजी नगरसेवक दशरथ तरे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या समवेत अटाळी शाखा असल्याचे स्पष्ट केले. तर वडवली विभागाच्या माजी नगरसेविका हर्षदा थविल यांनी मी बाहेर असल्याचे सांगून बोलण्यास नकार दिला. कल्याणचे माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असल्याचे सांगितले तर गणेश कोट यांनी वेट अँड वॉच वर लक्ष केंद्रित केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगितले, अ प्रभाग समितीचे माजी सभापती दयाशंकर शेट्टी यांचा आपणास कॉल आला होता. परंतु आपण बाहेर असल्याचे संबंधितांना सांगितले. मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतच राहणार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

कल्याण मधील पदाधिकारी, शिवसैनिक मातोश्रीसोबत असून काही नगरसेवक तळ्यात मळ्यात असून काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या समवेत असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत कल्याण मध्ये शिवसेनेत येत्या काही दिवसात वातावरण स्पष्ट होणार असल्याची चर्चा आहे.

बदलापूरमध्ये बॅनरवर ठाकरे आणि शिंदेंचे फोटो
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मंत्री नाहीत हे स्प्ष्ट केल्यांनतर, राज्यात ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक चित्र निर्माण झाले आहे. मात्र बदलापूरमधील नेत्यांची अवस्था वेगळी आहे. बदलापूरमध्ये शहरप्रमुख वामन म्हात्रे समर्थकांनी लावलेल्या बॅनरमध्ये बदलापूर मधील वामन म्हात्रे समर्थक शिंदे ठाकरे दोन्ही गटात आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक आमने-सामने येत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यभर शिंदे समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा फोटो नाही. बदलापूर शहरात मात्र वामन म्हात्रे समर्थकांनी लावलेल्या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मंत्री नाहीत असे स्प्ष्ट केल्यांनतर ठाकरे समर्थकांनी शिंदेंचा फोटो बॅनरवरून हटवला आहे.
बदलापूर मध्ये लावलेल्या बॅनरमध्ये दोघांचेही फोटो आहेत. त्यामुळे शिवसेनेत झालेल्या बंडखोरी नंतर बदलापूर मधील शिवसैनिक ठाकरे गटात आहेत कि शिंदे गटात असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठाणे जिल्ह्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं वर्चस्व आहे. शिवसेना शहरप्रमुख म्हात्रे हे सुद्धा शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शहरातील प्रत्येक समस्या वामन म्हात्रे हे शिंदे यांच्याकडे मांडतात. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मंत्री नसल्याचं घोषित केल्यानंतर स्थनिक नेत्यांची, इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळं स्थनिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली ठोक भूमिका स्पष्ट न करता शहरात केलेल्या बॅनरबाजी मध्ये दोन्ही नेत्यांचे फोटो लावले आहेत. त्यामुळे वामन म्हात्रे समर्थकांनी न्यूट्रल राहण्याची भूमिका घेतलीय का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -