महिलांचे मॉर्निंग वॉक चोरट्यांसाठी ‘सुवर्ण’संधी

सकाळच्या वेळेत सोनसाखळी खेचण्याच्या घटना

कल्याण शहरात सकाळचे मॉर्निंग वॉकला फिरणे महिला वर्गांसाठी धोकादायक ठरत आहे.  सकाळी साडे सहा ते सातच्या दरम्यान दुचाकीवरून अज्ञात चोरटे येतात आणि महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढण्याच्या घटना वाढल्या आहेत.

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी सकाळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन पदपथ, रस्त्यावर चालणार्‍या महिलांचे दागिने हिसकावले. कल्याण पूर्वे-पश्चिमेत सोनसाखळी खेचण्याच्या घटना सकाळच्या वेळेत वाढल्या असून एका महिन्यात पंधरा ते वीस अशा घटना घडल्या आहेत. कल्याण शहरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी वयोवृद्ध महिलांबरोबरच इतर महिला, तरुण मुली वॉक करण्यासाठी रस्त्यावरून पायपीट तसेच ओपन जिम तसेच मैदानात सकाळच्या सुमारास प्रभात फेरीसाठी येत असतात.

सकाळच्या सुमारास रस्त्यावरून तुरळक वाहतूक असल्याने याच संधीचा फायदा दुचाकीवरील चोरटे घेतात. सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान प्रतिमा तिवारी रामबाग येथून रिक्षा स्टॅन्डकडे निघाल्या असता त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम  वजनाची चैन मोटरसायकलवरून येणाऱ्यांनी लांबविली. तसेच काळा तलावाजवळील ठिकाणी मॉर्निंग वॉक करीत असलेल्या शिक्षिका कुमुदिनी चौधरी यांचे ७ ग्रॅम वजनाचे मणि मंगळसूत्र पळवून नेले, निर्मला पाल या चिकनघर येथून वॉक करण्यासाठी निघाल्या असता २७ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरट्यांनी खेचून नेली.

सीमरन धनावडे योगा क्लाससाठी जात असताना त्यांच्या हातातील किमती मोबाईल चोरट्यांनी हिसकावून धूम ठोकली. याबाबत महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.