घरठाणेकल्याणात शिवसैनिकांमध्ये राडा उपशहर प्रमुखावर तलवारीने हल्ला

कल्याणात शिवसैनिकांमध्ये राडा उपशहर प्रमुखावर तलवारीने हल्ला

Subscribe

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेच्या दोन गटांतील वातावरण कमालीचे तापले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक तसेच कल्याण शहर उपप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर बुधवारी सकाळी तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला शिंदे समर्थक नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप पालांडे यांनी केला, तर गायकवाड यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

कल्याण पूर्वेत राहत असणारे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे सकाळच्या सुमारास बाहेर जाण्यासाठी आपल्या चारचाकी गाडीमध्ये बसले असता दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी गाडीमध्ये घुसत त्यांच्यावर हल्ला केला. तलवारीचे काही घाव बोटांवर बसून जखमी झाल्याचे हर्षवर्धन पालांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शिवसेनेत पुढे जाऊन काम करीत असल्याचे हल्लेखोर बोलत होते. तसेच तुला कायमचे संपवून टाकू, अशी धमकी दिल्याचेही पालांडे म्हणाले.

- Advertisement -

हल्ल्याशी माझा संबंध नाही – महेश गायकवाड
हर्षवर्धन पालांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी माझा काडीमात्र संबंध नसल्याचे महेश गायकवाड यांनी सांगितले. पोलिसांनी याबाबत योग्य तो तपास करावा. माझ्यावर जर खोटे आरोप होत असतील तर न्यायालयात मानहानीचा दावा करणार असल्याचेही गायकवाड म्हणाले.

दरम्यान, हल्ला झाल्याची माहिती कल्याणसह उल्हासनगरात वार्‍यासारखी पसरल्याने हर्षवर्धन पालांडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा होऊ लागले आहेत. अंतर्गत वादावादीमुळे दोन गटांतील वाद विकोपास गेल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीसही अ‍ॅक्शन मोडमध्ये सतर्क झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर बशीर शेख यांना विचारणा करण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

- Advertisement -

उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार
कल्याणचे उपशहरप्रमुख असलेले हर्षवर्धन पालांडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची खबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समजताच त्यांनी भ्रमणध्वनीवर पालांडे यांची तब्येतीची चौकशी करीत आपण कल्याणमध्ये येत असल्याचे त्यांना सांगितले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटनेची गंभीरतेने दखल घेत कल्याण शहरात येणार असल्याने शिवसैनिकांना आपण वार्‍यावर सोडणार नसल्याचा मेसेज यानिमित्ताने दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे कल्याण शहरात येत असल्याने दोन गटांतील वादात झालेल्या हल्ल्याबाबत नेमकी कोणती भूमिका स्वीकारतात याकडे शिवसैनिक, पदाधिकारी यांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -