ठाण्यात काही तासांच्या अंतरावर भीषण आगीच्या तीन घटना

ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चरईत एका इमारतीच्या मीटर रूमला आग लागली. ती आग विझत नाही तोपर्यंत, शहराच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे घोडबंदर रोड येथील २१ व्या मजल्यावर गॅस सिलिंडरमधून गळतीने भडका होऊन दाम्पत्य जखमी झाले आहे. त्या घटनेनंतर काही तासातच हाजुरीतील सार्वजनिक बांधकाम खात्यातील विद्युत निरीक्षकाच्या कार्यालयाला आग लागली. रात्र भर ठाण्यात आगी प्रकार सुरूच होते. यामध्ये वित्तहानी झाली असून मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हाजुरीतील आगीवर तब्बल दोन तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.

सिलिंडरच्या भडक्यात दाम्पत्य जखमी

घरगुती गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे उडालेल्या भडक्यात महेश आणि प्रीती कदम हे दाम्पत्य जखमी झाले असून ही घटना शनिवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा या परिसरात घडली. त्या जखमी दाम्पत्याला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. कदम दाम्पत्य हे घोडबंदर रोड, भाईंदरपाड्यातील पुराणिक रुमा बाली पार्कमधील मित्री सोसायटीत २१ व्या मजल्यावर राहता. शनिवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास कदम दाम्पत्य जेवण करण्यासाठी बसले होते. त्याचदरम्यान त्यांंच्या किचन रुमध्ये एच.पी. गॅसची गळती होण्यास सुरुवात झाली होती आणि त्यातच घरातील देवाऱ्यात दिवा चालू असल्याने घरामध्ये आगीचा भडका झाला. सुदैवाने सिलिंडरचा स्फोट झाला नाही. पण त्या भडक्यात वयवर्ष ३९ असणारे घर मालक महेश हे ५२ ते ५५ तर त्यांची ३५ वर्षीय पत्नी प्रीती या ५० टक्के भाजलेत. त्या दोघांनाही उपचारासाठी ठाण्यातील मानपाडा येथील टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महेश कदम हे गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाप्रमुख संतोष कदम यांनी दिली.

विद्युत निरीक्षकाच्या कार्यालयाला आग

ठाणे येथील वेलडेकर मैदानाजवळ हाजुरी येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातील विद्युत निरीक्षकाच्या कार्यालयाला आग लागली. ही आग रात्री २.३५ वाजण्याच्या सुमारास लागली असून या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. आग माहिती मिळताच ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांसह ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली. यावेळी घटना स्थळी २ फायरवाहन, ४ वॉटर टँकर, २ रेस्क्यू वाहन व १ जम्बो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. ही आग तब्बल दोन तास म्हणजे रात्री ०४:२५ वाजता पुर्णपणे विझवण्यात यश आले. यामध्ये मोठ्या नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मीटर बॉक्सला आग

ठाण्यातील चरई येथील ग्रीन पार्क या इमारतीच्या मीटर बॉक्सला शनिवारी रात्री १० च्या सुमारास आग लागली. यामध्ये १० ते १५ बॉक्सला आग लागल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. चरई येथील ग्रीन पार्क ही तळ अधिक ७ मजली इमारत आहे. येथील तळ मजल्यावरील मीटर बॉक्सला आग लागल्याची माहिती मिळताच ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांसह ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली. यावेळी १ फायर वाहन आणि २ रेस्क्यू वाहन घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांना, काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश असून यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.