घरठाणेशहापुरात टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये वाढ

शहापुरात टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये वाढ

Subscribe

163 गावपाड्यांना 32 टँकरने पाणीपुरवठा सुरू

विहिरी कोरड्याठाक, बोअरिंग आटल्या, नादुरुस्त बोअरिंग, मागणी करूनही टँकर नाही अशी दुर्दम्य अवस्था तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील गावपाड्यांची झाली आहे. यंदा पाणीटंचाई ने कहर केला असून अनेक नवीन गावपाड्यांना टंचाईने ग्रासले आहे. यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपड्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत असून टँकर अभावी पाणीटंचाई चे भीषण संकट कोसळलेल्या भागातील माय भगिनींना पाण्यासाठी रणरणत्या उन्हात मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, तालुक्यातील तब्बल 163 गावपाड्यांना 32 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून दहा गावपाड्यांसाठी दोन टँकरची मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणार्‍या शहापूर तालुक्याच्या दुर्गम भागाला पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. गतसाली दमदार पाऊस होऊनही यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई भेडसावू लागली असून टंचाईग्रस्त भागात मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यावर्षी सावरोली, खैरे, शीळ, विठ्ठलगाव, निचितपाडा, साईनगर (बिरवाडी), घरतपाडा, भोईरपाडा, कातकरीवाडी अशा नवीन गावपाड्यांची टंचाईमध्ये भर पडल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकदिवसा आड किंवा दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी तासनतास वाट पहावी लागत असून तहान भागवण्यासाठी जीव व्याकुळ होत आहे. गेल्यावर्षी तब्बल 160 गावपाड्यांसाठी 25 टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र पाणीटंचाईने 160 चा पल्ला पार केला असून त्यामध्ये वाढ होत आहे. आजमितीस 163 गावपाड्यांना 32 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून दहा गावपाड्यांसाठी दोन टँकरची मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

- Advertisement -

माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या आवाळे ग्रामपंचायतीला पाणीटंचाई चा सामना करावा लागत आहे. आवाळे, चांदरोटी, कराडे, मामनोली, मसमाळ, बोरीचापाडा, काटेकुई, जांभूळपाडा, शेकटपाडा अशा एकूण 22 गावपड्यांमध्ये दहा विहिरी आणि किमान 40 बोअरिंग आहेत. यापैकी सहा विहिरी कोरड्याठाक पडल्या असून चार विहिरींनी तळ गाठला आहे. तर 40 पैकी शेंडेपाडा व बेरशिंगी येथील अवघ्या चार बोअरिंगलाच पाण्याचा स्रोत आहे. तर काही बोअरिंग नादुरुस्त स्थितीत आहेत. या भागातील गेल्या वीस वर्षांत कधीही न आटलेल्या विहिरी कोरड्याठाक पडल्या असून बोअरिंग चा स्रोत देखील आटला आहे. त्यामुळे माय भगिनींना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून बोअरिंगच्या पाण्याचा स्रोत आटल्याने बोअरिंग हापसून हापसून महिला भगिनींची दमछाक होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अजूनपर्यंत टँकर सुरू न झाल्याने माय भगिनींना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे येथील सरपंच लहू पाचलकर व उपसरपंच प्रदीप आगीवले यांनी सांगितले. बोअरिंग दुरुस्तीसाठी देखील वारंवार पाणीपुरवठा विभागाच्या खेट्या माराव्या लागत असल्याचे आगीवले यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -