घरठाणेमुंब्रा पोलिसांच्या ३० कोटींच्या घबाडाची चौकशी सुरू

मुंब्रा पोलिसांच्या ३० कोटींच्या घबाडाची चौकशी सुरू

Subscribe

मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरील बॉम्बे कॉलनी भागात राहणार्‍या फजल मेमन या व्यापार्‍यावर काही दिवसांपूर्वी मुंब्रा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक मदने तसेच अन्य काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मिळून मध्यरात्री त्यांच्या घरावर धाड टाकली होती. या धाडीत पोलिसांना ३० कोटींची रोकड आढळून आली होती.

मुंब्र्यातील एका खेळणी व्यापार्‍याच्या घरी धाड टाकून सापडलेल्या ३० कोटींच्या रकमेपैकी ६ कोटींचे घबाड हडप करण्याचा मुंब्रा पोलीस ठाण्यातील काही अधिकार्‍यांचा प्रयत्न उघडकीस आला होता. याबाबतचे सविस्तर वृत्त सोमवारच्या दैनिक आपलं महानगरमध्ये प्रकाशित झाले होते. त्याची राज्याच्या गृहखात्याने तातडीने गंभीर दखल घेत चौकशी सुरू करण्याचे निर्देश ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यानुसार सोमवारी या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरील बॉम्बे कॉलनी भागात राहणार्‍या फजल मेमन या व्यापार्‍यावर काही दिवसांपूर्वी मुंब्रा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक मदने तसेच अन्य काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मिळून मध्यरात्री त्यांच्या घरावर धाड टाकली होती. या धाडीत पोलिसांना ३० कोटींची रोकड आढळून आली होती. त्यामुळे ही रोकड मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये देण्यात आली आणि त्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी फैजल मेमन यांना धमकावून यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. मेमन यांनी यावेळी २ कोटी रुपये देण्याची तयारी दाखवून यातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्यक्षात उपस्थित पोलीस अधिकार्‍यांनी मेमन यांच्या ३० कोटींच्या रोकडमधून परस्पर ६ कोटी रुपये काढून घेतले आणि मेमन यांना केवळ २४ कोटी रुपये परत दिले.

- Advertisement -

याबाबत एक पत्र व्हायरल झाले होते. त्यामध्ये मुंब्रा पोलीस ठाण्यात त्यावेळी उपस्थित असलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी ६ कोटींची खंडणी वसूल केल्याची प्रमुख तक्रार होती तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात २४ तास सीसीटीव्ही सुरू असतो. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांनी केलेले प्रताप सीसीटीव्हीमध्ये बंदिस्त झाल्याची शक्यता असल्याने आता कळवा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी मुंब्रा पोलीस ठाणे येथे जाऊन या सर्व प्रकरणाची तपासणी व चौकशी सुरू केली. यावेळी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे जबाबही नोंदविण्यात आले. तसेच ज्या रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात येते, त्या रात्रीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेजही चौकशीसाठी आलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी तपासायला सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -