पेडियाट्रिक बेड्स सुविधांची पालिका आयुक्तांकडून पाहणी

कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, आरोग्य सुविधा करण्याकडे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे बारकाईने लक्ष

ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ५० पेडियाट्रिक आयसीयू आणि ५० पेडियाट्रिक ऑक्सिजन बेड्स सुविधांची सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त मनिष जोशी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, कार्यकारी अभियंता विनोद पवार, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिरुद्ध माळगावकर, डॉ. रोहित महावरकर, समन्वयक आधार कुलकर्णी आदी उपस्थित होते.

कोरोनाची वाढती तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याकडे त्यादृष्टीने आरोग्य सुविधा निर्मिती करण्याकडे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा बारकाईने लक्ष देत आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर लहान मुलांसाठी पेडियाट्रिक आयसीयू कक्ष निर्माण करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार या कक्षाची स्थापत्य, विद्युत आणि ऑक्सिजन सुविधेसह इतर सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे यापूर्वी व्हेंटिलेटरसहित २०६ आयसीयू बेड्स आणि ८८३ ऑक्सिजन बेडस कार्यान्वित आहेत. यामध्ये कोविड ग्रस्त लहान मुलांना अत्यावश्यक औषधोचार सुविधा तात्काळ मिळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी सुविधांनीयुक्त सुसज्ज असे ५० पेडियाट्रिक आयसीयू आणि ५० पेडियाट्रिक ऑक्सिजन बेड्सची उभारणी करण्यात आली आहे.  तसेच स्तनदा मातांसाठी विशेष कक्ष आणि मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया तयार करण्यात आला आहे. या सर्व सुविधांची महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी पाहणी केली.

तीन पीएसए प्रकल्प कार्यान्वित
रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासू नये म्हणून रुग्णालय परिसरात १३ किलोलिटरच्या दोन मोठ्या प्राणवायूचा टाक्या कार्यान्वित आहेत. त्या सोबतच प्रतिदिन अतिरिक्त ५ मेट्रिक टन इतका प्राणवायू वातावरणातील हवेतून तयार करता येईल असे ३ पीएसए प्रकल्प कार्यान्वित आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयसोलेशन बेड्स
या ठिकाणी रुग्णांना सर्व सोयी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी रक्त तपासणी, एक्सरे, औषधे या सर्व सुविधा तसेच तज्ञ वैद्यकिय पथक आणि प्रशासकीय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे हृदयरोग संबंधित रुग्ण तसेच आर्थोपेडिक रुग्णांसाठी ६ आयसीयू व ६ आयसोलेशन बेडस सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

ठामपाचे एकमेव जम्बो लसीकरण
पार्कींग प्लाझा येथील एकमेव जंबो लसीकरण केंद्रात सकाळी ९.०० ते रात्री ९.०० असे एकूण १२ तास नागरिकांच्या सोयीसाठी सतत लसीकरण सत्र सुरू असून यामध्ये १५ ते १८ आणि १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण सत्रे राबविण्यात येत आहेत. आजपर्यंत ६६,००० नागरिकांनी या लसीकरण केंद्रामध्ये लसीकरणाचा लाभ घेतला आहे.