घरठाणेआंबिवलीतील इराणी लोकांचा अंधेरी पोलिसांवर हल्ला

आंबिवलीतील इराणी लोकांचा अंधेरी पोलिसांवर हल्ला

Subscribe

दहा पोलीस जखमी

येथील आंबिवली भागातील इराणी वस्तीत गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका आरोपीचा शोध घेत असताना इराणी वस्तीमधील महिला, पुरूषांनी अचानक शोध घेणाऱ्या अंधेरी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात १० पोलीस जखमी झाले आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगडसह राज्याच्या विविध भागात नियमित भुरट्या चोऱ्या करणारे, सराईत गुन्हेगार आंबिवली मधील इराणी वस्तीत वास्तव्य करून असतात. आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ आणि आड बाजुने पळून जाण्यासाठी चोरट्यांना याठिकाणी सोयीस्कर जागा असल्याने बहुतांशी इराणी चोरटे या वस्तीत आश्रय घेऊन असतात. कल्याण परिसरातील स्थानिक पोलिसांनी या वस्तीमधील नागरिकांच्या हल्ल्याची माहिती असल्याने ते कौशल्याने या भागातील आरोपीला अटक करतात.
मुंबईचे पोलीस तुकडीने येऊन इराणी वस्तीमध्ये घुसून चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. या वस्तीच्या आतील भागाची माहिती नसल्याने इराणी वस्तीमधील नागरिकांनी एकदम हल्ला सुरू केला की पोलिसांची तारांबळ उडते. अशाप्रकारे गेल्या सहा महिन्यात दोन ते तीन वेळा मुंंबई पोलिसांवर हल्ले झाले आहेत. मागील अनेक वर्षात अशाप्रकारच्या ५० हून अधिक घटना घडल्या आहेत, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात. अंधेरी भागात झालेल्या एका चोरीच्या प्रकरणात आंबिवली मधील इराणी वस्तीमधील आरोपी सहभागी असल्याची खात्री पटल्यावर गुरूवारी मध्यरात्री अंधेरी पोलिसांची एक तुकडी इराणी वस्तीत आरोपीच्या शोधासाठी आली होती. यावेळी खडकपाडा पोलीस सोबत होते.
पोलीस वस्तीत शिरल्याची माहिती मिळताच आरोपीच्या कुटुंबीयांनी ओरडा करून वस्तीला जागे केले. वस्तीमधील महिला, पुरूषांनी पोलिसांवर दगडफेक, दांडके घेऊन पोलिसांचा पाठलाग करून त्यांना जखमी केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी इराणी वस्तीमधील हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -