ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री १८ जणांचा मृत्यू झाला. याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमून २५ ऑगस्ट पर्यंत अहवाल सादर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या होते. मात्र, अद्यापही डॉक्टर्स, नर्स यांच्याबरोबरच तेथील कर्मचाऱ्यांची चौकशी होणे बाकी आहे. त्यामुळे २५ ऑगस्टला अहवाल सादर होऊ शकलेला नाही. त्यातच चौकशी पूर्ण होण्यासाठी अजून १० ते १२ दिवस लागणार आहेत. म्हणजे हा अहवाल सप्टेंबर महिन्यात सादर होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्ट रोजी पाच जणांचा तर, रविवार १३ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी अवघ्या १२ तासात १८ रुग्णाचा मृत्यू झाला होता .दुसऱ्या दिवशी १४ ऑगस्टला ४ तर, १५ ऑगस्ट रोजी दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश दिले. त्यांच्या निर्देशानुसार ९ जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीत आरोग्य सेवा आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, आरोग्य सेवा संचालक मुंबई, सहाय्यक संचालक आदींचा समावेश आहे. या समितीला २५ ऑगस्ट पर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.
त्यात मागील आठवड्यात या समितीमधील प्रमुखांनी गुरुवार १७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास महापालिका मुख्यालयात हजेरी लावली होती. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात या समितीची बैठक घेतली.
यावेळी समितीने पहिल्याच दिवशी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित करीत, महत्वाची कागद पत्रे ताब्यात घेण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील कळवा रुग्णालयात जावून तेथील परस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे २५ ऑगस्ट पर्यंत समिती अहवाल सादर करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अजूनही डॉक्टर्स, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी आणि प्रशासकीय कामकाज (अडमीन) विभागातील कर्मचाऱ्यांची देखील चौकशी पूर्ण झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या सर्वांच्या चौकशीसाठी आणखी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या चौकशीनंतर अंतिम अहवाल सादर करण्यासाठी सप्टेंबर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.