Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम नवरदेवाच्या आईची दागिन्याची पर्स लंपास; फोटोच्या नादात गेला दोन लाखांचा ऐवज

नवरदेवाच्या आईची दागिन्याची पर्स लंपास; फोटोच्या नादात गेला दोन लाखांचा ऐवज

फोटोच्या नादात गमावले दागिने

Related Story

- Advertisement -

वधू वरासोबत फोटो काढण्यासाठी लग्न मंचावर गेलेल्या नवरदेवाच्या आईचे दागिने लग्न मंडपातून चोरीला गेल्याचा प्रकार ठाण्यातील घोडबंदर रोड येथे मंगळवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच या गुन्ह्याची उकल करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.

ठाण्यातील घोडबंदर रोड येथील ब्रह्मांडमधील श्रीजी कॉम्प्लेक्स येथे राहणारे रहिवाशी विमल गडा (काल्पनिक नाव) यांच्या मुलाचा मंगळवारी विवाह होता. या विवाहासाठी घोडबंदर रोड येथील हॉटेल कोर्टयार्डच्या शेजारी असलेल्या लॉन मध्ये विवाह समारंभ सुरु होता. सायंकाळी लग्न मंचावर वधूवरासोबत फोटो काढण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळीनी गर्दी केली होती. दरम्यान, काही नातेवाईकांनी वधु-वरा सोबत फोटो काढण्यासाठी नवरदेवाची आई विमला गडा यांना लग्न मंचावर बोलावले. विमल या लग्न मंचावर फोटो काढण्यासाठी आल्या. त्यांनी हातातील पर्स एका रिकाम्या खुर्चीवर ठेवली.

- Advertisement -

फोटो काढून झाल्यानंतर काही वेळाने विमल या पर्स घेण्यासाठी खुर्चीकडे गेल्या असता त्यांना खुर्चीवर पर्स मिळून आली नाही. त्यांनी आजूबाजूला पर्स शोधली. इतर नातेवाईकाकडे चौकशी केली. मात्र, पर्स कुठेच मिळून आली नाही. पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल फोन होते. असा सुमारे २ लाखांचा ऐवज होता. पर्समध्ये असलेल्या मोबाईलवर अनेकांनी फोन लावून बघितले. मात्र, विमल यांचा मोबाईल फोन लागत नव्हता. सर्व लग्न मंडपात शोधूनही पर्स न मिळाल्यामुळे अखेर रात्री उशिरा नवरदेवाची आई विमला यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लग्न मंडपात असलेले कॅमेर्‍याचे फुटेज तसेच लग्नाची व्हिडिओ शूटिंग करणार्‍याकडून शुटिंगचे फुटेज ताब्यात घेऊन अज्ञात चोरट्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. व्हिडिओ शूटिंग आणि लग्न मंडपातील कॅमेर्‍याच्या फुटेजमधून काही पुरावे मिळून आले असून लवकरच या चोरट्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.

- Advertisement -