कल्याण । शेअर बाजारात गुंतवणूक केली तर अधिकचा परतावा मिळेल, अशी आमिषे दाखवून अनोळखी व्यक्तिंनी ऑनलाईन माध्यमातून येथील दोन नोकरदारांची दोन वेगळ्या घटनांमध्ये एकूण एक कोटी ३१ लाखांना फसवणूक केली आहे. यामध्ये एक नोकरदाराची ८२ लाख ६१ हजार, दुसर्या नोकरदाराची ४८ लाख ७७ हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत या फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी फसवणूक झालेल्या नोकरदारांनी मानपाडा, टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. याप्रकरणांमध्ये पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हे दाखल केले आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील माहिती अशी की, फसवणूक झालेले एक नोकरदार आपल्या कुटुंबियांसह पलावा गृहसंकुल भागात राहतात. ते मुंबईत नोकरी करतात. जुलैमध्ये घरी असताना त्यांना अनोळखी महिलेने संपर्क करून शेअर बाजारात आपण गुंतवणूक केली तर डिसेंबर अखेरपर्यंत तुम्हाला ७०० टक्के नफा मिळून देतो असे सांगितले. तक्रारदाराला अनोळखी व्यक्तिंनी गुंतवणुकीसंंदर्भात विविध प्रकारची माहिती देऊन, त्यांना जुळण्या पाठवून त्यांना टप्प्याने लाखो रुपये अनोळखी व्यक्तिंनी दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाईन माध्यमाध्यमातून भरणा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे नोकरदाराने ८२ लाख ७५ हजाराची रक्कम संबंधितांकडे नोव्हेंबरपर्यंत भरणा केली.
या रकमेवर नोकरदाराने अधिकचा परतावा मागण्यास सुरूवात केली. अनोळखी व्यक्ति रक्कम परत मिळण्यासाठी अधिकची रक्कम तक्रारदाराला भरण्यास भाग पाडत होते. गुंतवणुकीची मूळ रक्कम परत करण्यासाठी तक्रारदाराने तगादा लावला. त्याला अनोळखी इसमांनी नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे कळल्यावर नोकरदाराने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल गुन्ह्यातील माहिती अशी की, तक्रारदार हे नोकरदार आहेत. ते पाथर्ली भागात राहतात. तीन अनोळखी इसमांनी तक्रारदाराला शेअर बाजार, आयपीओ गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला भुलून नोकरदाराने ४८ लाख ७२ हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून तीन इसमांनी दिलेल्या बँक खात्यावर जमा केले. ही रक्कम परत मिळण्यासाठी तीन इसमांकडून टाळाटाळ सुरू होताच, आपली फसवणूक झाल्याचे नोकरदाराच्या लक्षात आले. त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे, जुलै ते नोव्हेंबर कालावधीत हा प्रकार घडला आहे.