कल्याण । कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील परप्रांतीय अखिलेश शुक्ला अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. या मारहाण प्रकरणी इतर दोन जणांना देखील ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकार्यांची एसीपीमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. कल्याणच्या योगीधाममधील मराठी कुटुंबाच्या मारहाणीचे प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात उमटल्यानंतर पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली असून यातील मुख्य आरोपीसह इतर दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी यावेळी दिली. या घटनेत मारहाण झालेल्या देशमुख कुटुंबियांचा पुन्हा एकदा जबाब घेतला जाणार असल्याचेही झेंडे यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या अटकेची प्रक्रिया शुक्रवारी सायंकाळी सुरू होती. शुक्ला हा टिटवाळा आणि शहाड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींना अटक करण्याचे काम सुरू असून सध्या ८ ते १० जणां विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असल्याचे उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.
पोलीस अधिकार्याचीही चौकशी
या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला खडकपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्यांकडून अन्याय वागणूक देण्यात आल्याचा आरोप नागरिकांच्या शिष्टमंडळाने केला आहे. त्याची दखल घेत कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांच्या माध्यमातून त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहितीही यावेळी डीसीपी अतुल झेंडे यांनी यावेळी दिली. तसेच या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही झेंडे यांनी दिला आहे.