कल्याण। गेल्या आठवड्यात येथील योगीधाम आजमेरा हाईट्समध्ये मराठी कुटुंबियांना मारहाण करणार्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखिलेश शुक्ला यांच्यासह सात जणांना खडकपाडा पोलिसांनी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सरकार पक्षाची बाजू ऐकून शुक्ला यांच्यासह सात जणांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणात शासनाच्या पर्यटन विकास महामंडळातील व्यवस्थापक अखिलेश शुक्ला, त्यांची पत्नी गीता, सुमित जाधव, दर्शन बोराडे असे एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आजमेरा सोसायटीत शुक्ला यांच्या शेजारी राहणार्या लता कळवीकट्टे आणि धीरज देशमुख यांच्या कुटुंबियांना शुक्ला आणि त्यांच्या मित्रांनी जबर मारहाण केली होती. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी धीरज देशमुख, अखिलेश शुक्ला यांनी परस्पर विरोधी तक्रारी केल्या होत्या. याप्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले. पोलिसांनी तत्परतेने मराठी कुटुंबीयांना मारहाण करणार्या मारेकर्यांना अटक केली होती.
वकिलावर रोष
शुक्रवारी कल्याण न्यायालयात शुक्ला यांच्यासह इतर मारेकर्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलीस कोठडीच्या विषयावर मारेकर्यांच्या एका समर्थकाने देशमुख यांचे वकील अॅड. हरिश सरोदे यांच्यावर डोळे मोठे करून रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास येताच अॅड. सरोदे यांनी हे न्यायालय आहे असे आरोपीला सांगा. डोळे मोठे करायचे नाहीत, अन्यथा पोलीस ठाण्यात तक्रार करीन, असे शुक्ला समर्थकांना सुचविले. यावरून अॅड. सरोदे आणि समर्थक यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. शुक्ला समर्थकांनी हा विषय नाहक वाढविण्यात आला, असे सांगितले.