कल्याण । कल्याणच्या अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत धूप-अगरबत्ती लावल्याच्या कारणावरून एमटीडीसीत अधिकारी असलेला अखिलेश शुक्ला याने गुंडांच्या मदतीने एका मराठी कुटुंबाला जबर मारहाण केल्याचे प्रकरण शुक्रवार २० डिसेंबरला समोर आले होते. या घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटल्यावर शुक्लाचे निलंबन करण्यात आले. या घटनेला २ दिवस उलटत नाही तोच रविवारी अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका मराठी कुटुंबाला परप्रांतीय दाम्पत्याने मारहाण केल्याची घटना कल्याणच्या आडवली परिसरात घडली आहे.
कल्याणच्या आडवली परिसरात रागाई नावाची इमारत आहे. या इमारतीत एकमेकांशेजारी राहणार्या दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा शेजारच्याकडून विनयभंग झाल्याची तक्रार या मुलीच्या आईवडिलांनी केली. याबाबत संबंधित परप्रांतीय कुटुंबाला जाब विचारला असता पांडे आडनावाच्या दाम्पत्याने मराठी कुटुंबातील तरुण, त्याची पत्नी आणि आईलाही मारहाण केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पांडे पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या हल्ल्यात तरुण जबर जखमी झाला असून तो पोलीस कर्मचारी असल्याचे समजते. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कल्याणमध्ये २ दिवसांपूर्वी अखिलेश शुक्लाने तुम्ही मराठी माणसं घाण आहात, मटण मच्छी खाता, असे म्हणत गुंडांच्या मदतीने एका मराठी कुटुंबाला मारहाण केली होती. हे प्रकरण विधिमंडळात गाजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमटीडीसीत अधिकारी असलेल्या अखिलेश शुक्ला याच्या निलंबनाचे आदेश दिले होते.