कल्याण : चार दिवसांपूर्वी कल्याणमधील योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने जबर मारहाण केल्याची घटना घडली. सरकारी अधिकारी असलेल्या अखिलेश शुक्ला याने गुंडांना बोलावून देशमुख कुटुंबियांना मारहाण केली. या घटनेत अभिजित देशमुख हे गंभीर जखमी झाले. ज्यानंतर या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्ला याच्यावर कारवाईचे आदेश दिले. या घटनेला उलटून काही दिवस होत नाही तेच आता पुन्हा कल्याणमध्ये एका परप्रांतीयाची मुजोरी पाहायला मिळाली आहे. उत्तम पांडे या परप्रांतीयाने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. (Kalyan Crime Another Marathi family beaten up by Parprantiy)
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत उत्तम पांडे नामक परप्रांतीय आरोपी वास्तव्यास आहे. या उत्तम पांडे याने मराठी कुटुंबातील एका चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केले. या चिमुकलीने जेव्हा याबाबतची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली, तेव्हा या मराठी कुटुंबाने पांडेला याबाबतचा जाब विचारला. परंतु, या उर्मट परप्रांतीयाने जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबास मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी या पांडेला जाब विचारण्यासाठी गेलेल्या गेलेल्या पुरुषाच्या महिलेला आणि आईला सुद्धा पांडे आणि त्याच्या बायकोने मारहाण केली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतचे सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
हेही वाचा… Accident : रायगडमध्ये 36 तासांत दुसरी दुर्घटना, खासगी बस पेटली
या मारहाणीत मराठी पुरुष जखमी झाला असून त्याच्या आईला आणि पत्नीलाही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आरोपी उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परंतु, या गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा परप्रांतीयाने एका मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आल्याने हे परप्रांतीय सुधारणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु, कल्याणमध्ये परप्रांतींयांची वाढती दादागिरी हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांकडून पुढे काय कारवाई करण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.