डोंबिवली । डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या निकालांवरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून यावरून राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर, डोंबिवलीसह कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काही उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे राजू पाटील आणि उद्धव ठाकरे गटाचे सुभाष भोईर या दोन दिग्गजांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे रितसर अर्ज दाखल केला आहे. त्यांनी मतमोजणीदरम्यान झालेल्या त्रुटी आणि गोंधळावर प्रकाश टाकत व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली आहे.
निकालानंतर काही तासांनी अचानक वाढलेली मतांची टक्केवारी, मतदानाच्या दिवशी ईव्हीएमच्या बॅटरीचा वापर आणि मतमोजणीच्या दिवशी दाखवली गेलेली फुल्ल बॅटरी या कारणांमुळे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत जनतेमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. या मतदारसंघात ‘कांटे की टक्कर’ होणार असल्याचे अनेकांनी गृहीत धरले होते. मात्र, शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजेश मोरे यांनी अनपेक्षितरित्या ६६,४३४ मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या या यशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्थानिक नेत्यांचे वर्चस्व असूनही त्यांचा पराभव झाल्याने दोन्ही पराभूत उमेदवारांनी ईव्हीएममध्ये गडबडीचा संशय व्यक्त केला आहे.
मनसेचे राजू पाटील यांनी २२ व्हीव्हीपॅट मशीन, तर ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांनी ५ मशीनच्या फेरमोजणीसाठी अर्ज केला आहे. यासोबत आवश्यक शुल्क भरून अधिकार्यांकडे याबाबत चर्चा केली आहे. जिल्हाधिकार्यांनी मतमोजणीची तारीख आणि ठिकाण लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगितले आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील जनतेमध्ये या निवडणूक निकालावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. अनेकांना निकाल अपेक्षाभंग करणारे वाटत असून फेरमोजणीनंतर सत्य समोर येईल, अशी अपेक्षा मागणी करणार्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, पराभूत उमेदवार भविष्यात एकत्र येऊन काम करतील का, हा प्रश्नही चर्चेचा विषय ठरत आहे. राजू पाटील आणि सुभाष भोईर यांच्या अर्जामुळे कल्याण ग्रामीण मतदारसंघात फेरमोजणी होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले आहे. या प्रक्रियेमुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण होईल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. फेरमोजणीमध्ये सत्य समोर आल्यानंतर पुढील राजकीय हालचाली कशा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.