कल्याण । कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स इमारतीतील अलिकडील आगीच्या दुर्घटनेवरून आमदार भोईर यांनी केडीएमसी प्रशासनावर तीव्र टीका केली. आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक उंच शिडीची गाडी बंद असल्याने त्याच्या उपयोगाअभावी ही दुर्घटना मोठी ठरू शकली असती. या विषयीची अधिकार्यांनी सहा महिने फाईल रखडवून ठेवली, ही गंभीर दुर्लक्षाची बाब आहे, असे ते म्हणाले. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांना याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असा आग्रह धरत भोईर यांनी सांगितले की, जर प्रशासन आपल्या जबाबदार्या पार पाडत नसेल, तर आम्ही त्यांना जबाबदार ठरविण्यासाठी कडक पावले उचलू असा इशाराही आमदार भोईर यांनी दिला आहे.
गगनचुंबी इमारतींमध्ये वाढत्या आगीच्या घटना
मंगळवारी कल्याण मधील वरटेक्स या गगन चुंबी इमारतीच्या १५ व्या माळ्यावर आग लागली. ही आग आटोक्यात आणायला कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला यश आले. मात्र ही आग आटोक्यात आणण्यासाठीची यंत्रणा ठाण्यावरून मागवावी लागली, केडीएमसीकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेवर टीका होत आहे. यामुळे येथील या गगनचुंबी इमारतीत राहणार्या नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
कल्याण-डोंबिवली आणि टिटवाळा परिसरात गगनचुंबी इमारतींच्या वाढत्या संख्येसोबत अग्निशमन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. नुकत्याच एका १६ मजल्यांवर लागलेल्या आगीत उच्चतम दाबाने पाणी मारा करणार्या वाहनाच्या तांत्रिक बिघाडामुळे ठाणे महापालिका आणि बदलापूर नगरपालिकेच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनांची मदत घ्यावी लागली. या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती नाही, परंतु वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
या घटनेत ठाणे महापालिका आणि बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागांनी तत्परतेने काम केले. घटनास्थळी पाच अग्निशमन बंब, पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका सज्ज होत्या. आगीचे गांभीर्य लक्षात घेता, परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर होते. डॉ. जाखड यांनी ७० मीटर हायड्रोलिक वाहन खरेदी करण्याचा मानस व्यक्त केला, जे २५ व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकते.
इमारती गगनचुंबी मात्र सुरक्षा कमकुवत
कल्याण-डोंबिवली शहर आणि परिसरात ३०-४० मजल्यांपर्यंत उंच इमारती उभ्या राहत आहेत. सध्याच्या अग्निशमन यंत्रणेतील टर्न टेबल लेंडर १७ व्या मजल्यापर्यंतच पोहोचते, त्यामुळे त्यापेक्षा जास्त मजल्यांवरील आग आटोक्यात आणणे कठीण ठरते. भविष्यात ५० मजल्यांपर्यंत इमारती उभ्या राहण्याची शक्यता असल्याने आताच्या यंत्रणा अपुरी ठरणार आहे.
आग प्रतिबंधक यंत्रणांची उपेक्षा
गगनचुंबी इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे, परंतु त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होते. इमारतींच्या सजावटीच्या नावाखाली ही यंत्रणा झाकून ठेवली जाते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ही साधने लवकर सापडत नाहीत. नागरिकांमध्ये या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
आगीचे कारण आणि प्राथमिक तपासणी
अग्निशमन विभागाने प्राथमिक तपासणीत आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याची शक्यता वर्तवली आहे. तरीही, अशा गगनचुंबी इमारतींमध्ये सुरक्षा उपाययोजना आणि आग प्रतिबंधक यंत्रणांची योग्य देखभाल अत्यावश्यक आहे.
अग्निशमन यंत्रणेचा आढावा
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सध्या सहा केंद्रे, २१ अग्निशमन बंब, आणि २२१ कर्मचारी आहेत. विभाग वेळोवेळी नागरिकांना मार्गदर्शन करत असला तरी वाढत्या उंच इमारतींना सामोरे जाण्यासाठी आणखी प्रगत साधनांची गरज आहे.
भविष्यातील उपाययोजना
डॉ. जाखड यांनी लवकरच ७० मीटरची हायड्रोलिक शिडी खरेदी केली जाणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, भविष्यात ५० मजल्यांपर्यंत इमारती वाढण्याची शक्यता लक्षात घेता, अधिक आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
नागरिकांमध्ये जागरूकतेची आवश्यकता
अग्निशमन विभागाने नागरिकांना वेळोवेळी सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. तसेच, गगनचुंबी इमारतींमध्ये बसवलेल्या आगीविरोधी यंत्रणांची तपासणी दर काही महिन्यांनी केली जावी. या यंत्रणा सदोष असल्यास संबंधित सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करावी. गगनचुंबी इमारतींमुळे शहराच्या विकासाला गती मिळत असली तरी आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यातील सुरक्षा उपाययोजना किती सक्षम आहेत, याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. उंच मजल्यांवरील नागरिकांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी आधुनिक अग्निशमन यंत्रणांची गरज असून, नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे.