HomeठाणेKalyan : परप्रांतीय टोळीची मराठी माणसांना जबर मारहाण

Kalyan : परप्रांतीय टोळीची मराठी माणसांना जबर मारहाण

Subscribe

कल्याणमध्ये उच्चभ्रू गृहसंकुलात राडा

कल्याण । कल्याणमध्ये उच्चभ्रू गृहसंकुलात मोठा राडा झाला असून मंत्रालयात काम करणार्‍या परप्रांतीयाने मराठी माणसाला जबर मारहाण केली आहे. हा व्यक्ती गाडीत अंबर दिवा लावून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सोसायटीमधील नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी मारहाण करणार्‍या व्यक्ती विरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला २४ तासात अटक न केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा मनसेने दिला आहे. कल्याण पश्चिमेतील योगी धाम परिसरातील अजमेरा हाईटस या गृहसंकुलात राहणार्‍या अखिलेश शुक्ला याने धूप लावण्याच्या वादातून दहा ते पंधरा जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. २४ तासात अखिलेश शुक्लाला अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरु, शुक्ला जिथे कुठे असेल त्याला मनसे स्टाईलने पोलीस स्टेशनला हजर करु असा इशारा मनसेने दिला आहे. तर खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे.

अखिलेश शुक्ला याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कळवीकटे राहतात. बुधवारी रात्री शुक्ला यांनी घराबाहेर धूप लावले होते. धुपाच्या धुराचा शेजार्‍यांना त्रास होता होता. याबाबत शेजारी विजय कळवीकटे याने शुक्ला यांना टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादातून शुक्ला यांनी बाहेरून दहा ते पंधरा जणांना बोलावून घेतले. सोसायटीतील लोकांना माराहाण केली. या मारहाणीत विजय कळवीकटे, अभिजीत देशमुख, धीरज देशमुख हे जखमी झाले आहेत. यातील अभिजीत देशमुख गंभीर जखमी असून त्यांच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालायत उपचार सुरू आहेत.
अखिलेश शुक्ला हे मंत्रालयात काम करतात, त्यांच्या गाडीवर अंबर दिवा लावून फिरतात. त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर तो त्यांना दमबाजी करतात, असा आरोप आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले की, धूप लावण्याच्या वादातून हाणामारी झाली आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अखिलेश शुक्ला यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे.

तुम्ही मराठी आहात, माझी ताकद माहित नाही
दरम्यान अखिलेश शुक्ला हा सातत्याने मराठी माणसांना दमबाजी करतो. तुम्ही मराठी आहात. तुम्हाला माझी ताकद माहिती नाही. अशा प्रकारे लोकांना भिती दाखवितो. या बाबत मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलिसांची भेट घेतली आहे. अखिलेश शुक्ला याची मुजोरी मोडीत काढली पाहिजे. त्याची गुंडगिरी सातत्याने सुरु असते. २४ तासांत त्याला अटक केली नाही तर मनसे स्टाईलने शुक्ला याला धडा शिकवून त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ असा इशारा दिला आहे.