कल्याण । कल्याण शहरातील पोलिसांनी थर्टीफर्स्टच्या निमित्ताने अमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत रविवारी रात्री उशिरा १०८ नशेबाजांना पकडण्यात आले, त्यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. यासोबतच दुचाकीवर ट्रिपल सीट घेऊन भरधाव वेगाने वाहन चालवणार्या ९२ जणांना पकडण्यात आले. याबाबत कल्याण परिमंडळ ३ चे डीसीपी अतुल झेंडे म्हणाले की, थर्टीफर्स्टच्या निमित्ताने ही मोहीम कल्याण परिमंडळातील आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत रविवारी रात्री १०८ नशेबाजांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय ट्रिपल सीट असलेल्या वेगाने दुचाकी चालवणार्या ९२ जणांना पकडण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उद्याने, मैदाने, निर्जन ठिकाणांवर रात्रीच्या वेळी लक्ष ठेवण्यात येत आहे.
आमदारांकडून कल्याण पोलिसांचे अभिनंदन
कल्याण-डोंबिवलीतील गुंड, गुन्हेगार आणि अमली पदार्थांच्या व्यसनाधीनांवर सातत्याने होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी परिमंडळ ३ चे डीसीपी अतुल झेंडे यांचे अभिनंदन करून पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे. पत्रकारांशी बोलताना आमदार मोरे म्हणाले की, अशा कारवाईमुळे गुन्हेगारी घटनांना आळा बसेल, समाजात चांगले वातावरण निर्माण होईल.
गुंगी आणणार्या औषधांच्या २४० बाटल्या जप्त
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलीस अलर्ट झाले आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा परिसरात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैना केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक शोध घेत असताना हवालदार कलगोंडा बन्ने यांना सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास मुंब्रा देवी मंदिर जवळील बोगद्यानजिक गुंगी आणणारे औषध घेऊन एकजण येणार असल्याची माहिती मिळाली. प्रतिबंधीत कोडीनयुक्त गुंगीचे हे औषध होते. सकलेन निसार (२२) याच्याकडून २४० बाटल्यांचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मादक पदार्थ रॅकेट चालविणारी मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सानप या संदर्भात अधिक तपास करीत आहेत.