HomeठाणेKalyan : मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी राजकीय नेते एकवटले 

Kalyan : मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी राजकीय नेते एकवटले 

Subscribe

पोलीस उपायुक्तांची घेतली भेट

कल्याण । कल्याण पश्चिमेतील योगीधाममधील मराठी कुटुंबाच्या मारहाणीचे प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी राजकीय पक्षांसह सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि सोसायटीमधील रहिवाशांनी कल्याण परिमंडल ३चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मारहाण करणार्‍या अखिलेश शुक्ला याला त्वरित अटक करून त्याचे निलंबन करण्यात यावे, गुन्हा दाखल करण्यास उशीर करणार्‍या एपीआय लांडगे यांचे पण निलंबन करा आदी मागण्या यावेळी या नागरिकांनी केल्या.

आरोपीला अटक न केल्यास उद्या दुकाने बंद करून कल्याण मुरबाड रोड बंद करणार असल्याचा इशारा यावेळी पोलिसांना देण्यात आला. या शिष्टमंडळात मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, मनसेच्या महिला शहर अध्यक्षा कस्तूरी देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी, रुपेश भोईर, माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन जाधव, सचिव अतुल सरगर, योगीधाम व्यापारी संघटनेचे उमेश वाघ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, जिल्हा संघटक छाया वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, गणेश जाधव, अनघा देवळेकर, मराठा क्रांती मोर्चाचे धनंजय जोगदंड आदींसह प्रमुख पदाधिकारी यांच्यासह योगीधाम येथील स्थानिक नागरिकही उपस्थित होते.