कल्याण । परप्रांतीय अधिकार्याच्या इशार्यावरून मराठी कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला करणार्या अखिलेश शुक्ला यांच्यासह आठ ते दहा जणांच्या संघटीत टोळीवर मोक्का अन्वये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन जबर जखमी झालेल्या अभिजीत यांच्या भावाने उच्चपदस्थ पोलीस अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. पोलिसांच्या गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत मोक्का अंतर्गत चौकशीचे मागणी धीरज देशमुख यांनी केली आहे.
१८ डिसेंबर रोजी कल्याण मधील अजमेरा हाइट्स या योगीधाम परिसरातील हाय प्रोफाईल सोसायटीत धूप लावण्यावरून शुक्ला आणि देशमुख यांच्यात वाद झाला होता. मराठी परिवाराच्या संदर्भात भांडणादरम्यान टीका टिप्पणी करीत मराठी कुटुंबाला शुक्ला यांनी वेगळे बोल सुनावले होते. वाद झाल्यानंतर शुक्ला यांनी आठ ते दहा जणांना संकुलनात बोलवून देशमुख परिवारावर हल्ला चढविला होता. यात तीन जण जखमी झाले होते. शुक्ला मंत्रालयात अधिकारी पदावर असल्याने त्यांच्या वाहनात असलेला अंबरदिवा प्रकरण चौकशीत बाहेर आले होते.
गुन्ह्यात आठ ते दहा मारेकरी आणणार्या अनोळखी टोळक्यांकडून परिवाराला संपविण्याचा हेतू असल्याचे निवेदनात देशमुख यांनी म्हटले आहे. अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या पत्नीने फोन करीत मारेकर्यांना बोलविण्यापूर्वी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे धीरज देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. खडकपाडा पोलिसांना आपण जबाब दिला आहे. परंतु तपासात संघटित टोळीचा म्होरक्या कोण आहे याचा तपास करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे. अखिलेश शुक्ला यांचे नातेवाईक प्रशासनात असल्याने सर्व प्रकरणच दडपून टाकण्यासाठी गोपनीयपणे कटकारस्थान चालवले असल्याचा आरोप देशमुख यांनी निवेदनात केला आहे. त्या अनुषंगाने पोलीस सखोल तपास करीत नसून आमचा मर्डर झाल्यावर पोलीस तपास करणार आहेत का? असा सवाल निवेदनात उपस्थित केला गेला आहे.