कल्याण । नऊ लाखाचा मंजूर साकाव गेला कुठे? अशा मथळ्या खाली ‘ आपलं महानगर’ ने २९ डिसेंबरच्या अंकात मुरबाड जवळील फांगुनगव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील भेडसावणार्या प्रश्नास ठळक प्रसिद्धी दिली होती. या वृत्ताची संबंधित प्रशासकीय अधिकार्यांनी गंभीरतेने दखल घेत साकव बनवण्याकरता वर्क ऑर्डर काढल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ‘आपलं महानगर’ने ठळक मथळ्याखाली वृत्त दिल्याने आता आदिवासींना भेडसावणारा प्रश्न संपुष्टात येणार आहे. दैनिक ‘आपलं महानगर’चे वाडीतील आदिवासी नागरिकांनी भरभरून कौतुक करीत आभार मानले आहेत. मुरबाड तालुक्यातील शेवटची ग्रामपंचायत असलेली फांगुणगव्हाण ते मोरोशी दरम्याच्या साकावचे लवकरच काम सुरू होईल अशी माहिती आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटातील शेवटची ग्रामपंचायत म्हणून फांगुणगव्हाण ओळखली जाते. परंतु अद्यापही मुरबाड तालुक्यातील आदिवासींना, रस्ते, आरोग्य, पाणी, वीज यासारख्या मुलभूत सोईसुविधा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात आहेत.
फांगुणगव्हाण या १०० टक्के आदिवासी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना, शाळकरी मुलामुलींना मोरोशी येथे जाण्यायेण्यासाठी रस्ता नाही. जो रस्ता उपलब्ध आहे तो खूप दूरचा तसेच त्रासदायक आहे. त्यामुळे येथील नागरिक गावादरम्यान असलेल्या ओहळ, नाला पार करत जीव धोक्यात घालून ये-जा करतात. काही वर्षांपूर्वी या नाल्यातून एक मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. त्यामुळे या नाल्यावर साकाव पूल उभारला जावा म्हणून सरकारी दरबारी अर्ज, विनंत्या, तक्रारी येथील नागरिकांनी केल्या होत्या. ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ रोहन घुगे, बांधकाम विभागाचे एस आर चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी विशेष बाब म्हणून या साकावसाठी तब्बल ५१ लक्ष रुपये मंजूर केले. परंतु त्याची वर्क ऑर्डर निघत नव्हती. यावर २९ डिसेंबरच्या ‘आपलं महानगर’च्या अंकात वृत्त प्रसिद्ध होताच अखेरीस ३० डिसेंबर २०२४ रोजी या कामाची वर्क ऑर्डर निघाली. लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याविना सुरु असलेला आमचा वनवास आता संपेल असा विश्वास सुदाम भला, भगवान भला, किरण कारभाळ, भाऊ वाख, उपसरपंच रविंद्र भला, नानू मेंगाळ, सदस्या मनिषा कारभळ, राजु भला आदी ग्रामस्थांनी व्यक्त केला.