लोकल गाडीसाठी स्वतंत्र स्थानक असतानाही मेल एक्सप्रेसच्या थांब्यासाठी वारंवार फलाट बदली केले जातात.
सकाळी ११:१०, १२:१९ आणि ४:१६ या लोकल गाड्यांना मेल एक्सप्रेस थांब्यावरील फलाट क्रमांक १ आणि २ वर वळवल्या जातात. त्यामुळे प्रवाशांची धावपळ होते. अगदी लोकल सुटण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत प्रवाशांची धावपळ होत असल्याने अपघाताचा धोकाही संभवतो.
मध्य रेल्वे मार्गावरील कसारा स्थानक हे नाशिक आणि मुंबई या महानगरांचे प्रवेशद्वार मानले जाते. दोन्ही महानगरातून हजारो प्रवासी दररोज कसारा स्थानकातून ये-जा करतात. कसारा स्थानकात फलाट क्रमांक ४ हे उपनगरीय लोकल गाडीचे स्वतंत्र स्थानक आहे. मात्र लोकल स्थानकात येण्यापूर्वी सकाळ आणि दुपारच्या सत्रातील एकूण ३ ते ४ लोकल फेर्या फलाट क्रमांक १ आणि २ वरून सोडल्या जातात. त्यामुळे उद्घोषणा होताच फलाट क्रमांक चारहून एक आणि दोन क्रमांकाचे स्थानक गाठताना प्रवाशांची तारांबळ उडते. डोक्यावर पाठीवर असलेल्या पिशव्या आणि बॅगांचे ओझे. त्यात हाताशी असलेले चिमुकले आजी आजोबा यांना घेऊन अनेक प्रवासी लोकल गाडी पकडण्यासाठी धडपड करत असतात. अशातच लोकल स्थानकात येताच नाशिक दिशेने जाणारे प्रवासी आणि मुंबई दिशेने जाणार्या प्रवाशांची पादचारी पुलाच्या जिन्यात झुंबड उडते. त्यामुळे जिन्यात प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होते. लोकल सुटतानादेखील प्रवासी जीव मुठीत घेऊन कसेबसे गाडी पकडतात. अशावेळी प्रवासी वेळेच्या बचतीसाठी लोकल पकडण्यासाठी जीवघेणा प्रवास करत असतात. त्यामुळे लोकल पकडताना तोल जाऊन खाली पडून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.