घरठाणेकेडीएमसी आयुक्तपदी डॉ. इंदूराणी जाखड यांची नियुक्ती

केडीएमसी आयुक्तपदी डॉ. इंदूराणी जाखड यांची नियुक्ती

Subscribe

विद्यमान प्रशासक डॉक्टर दांगडे यांची तडकाफडकी बदली

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक म्हणून डॉक्टर इंदूराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून दीड वर्षांपूर्वी कार्यभार सांभाळणारे डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांची उचल बांगडी केल्याने पालिकेत या घटनेने खळबळ उडाली आहे. डॉक्टर इंदू राणी जाखड या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्याकडील पदभार त्वरित स्वीकारण्यात यावा तसेच पुढील आदेश मिळेपर्यंत महिला आर्थिक विकास महामंडळाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळावा, असे राज्य शासनाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी 12 जुलै 2022 रोजी केडीएमसीच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. दीड वर्षातच दांगडे यांची महाराष्ट्र पेट्रोल केमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी निवड केली गेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत डॉक्टर दांगडे हे प्रशासक म्हणून कार्यरत राहतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र त्यापूर्वीच त्यांची उचलबांगडी केल्याने येथे चर्चेला उधाण आले आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून डॉक्टर दांगडे यांच्याकडे पाहिले जात होते. ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत असतानाच डॉ. शिंदे यांनी त्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेत आयुक्तपदी आणत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र अचानक त्यांची बदली करीत डॉक्टर इंदू राणी जाखड यांची कल्याण डोंबिवली आयुक्त तथा प्रशासक म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केल्याने या बदलीने अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्याने तत्कालीन नगरसेवकांची विकास कामा संदर्भात दांगडे यांनी मोठी गोची करून ठेवल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी वेळोवेळी केला होता. यामुळे सत्ताधार्‍यांना ते नकोच होते, असे चित्र दांगडे यांच्याबद्दल निर्माण करण्यात आले होते. डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्या प्रशासकीय राजवटीत पालिकेच्या बोगस बांधकाम परवानग्या तसेच महारेराची फसवणूक झाल्याप्रकरणी मोठी चर्चा रंगली होती. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक तसेच आर्किटेक्ट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत कल्याण डोंबिवली येथील कारभाराच पितळ उघड पडलं होतं. एकीकडे शहर स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि वाढत्या अनधिकृत बांधकामांकडे डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी सतत दुर्लक्ष केल्याने समस्या सुटण्याऐवजी त्या अधिक गहन होत चालण्याची स्थिती शहरात जाणवू लागली होती. केडीएमसीतील कामकाजाकडे डॉक्टर दांगडे यांनी पुरेसे लक्ष न दिल्याने प्रशासनाच्या विरोधात सतत पालिकेवर होणारी आंदोलने वाढली होती.

बदलीने दांगडे नाराज ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील सनदी अधिकारी म्हणून डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची दीड वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. कल्याणमध्ये आयुक्त पदावर येण्यापूर्वी ते ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. कल्याण डोंबिवलीत आयुक्त पदावर गेले दीड वर्षे काम करताना आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी उत्तम संबंध प्रस्थापित केले होते. मात्र असे असताना देखील त्यांची पेट्रोकेमिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर बदली करण्यात आल्याने ते काहीसे नाराज असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. याबाबत त्यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला असता त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

- Advertisement -

डॉ.इंदुराणी जाखड पहिल्याच महिला पालिका आयुक्त
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी तथा प्रशासक पदी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या आयएएस अधिकारी डॉक्टर इंदूराणी जाखड या केडीएमसीच्या इतिहासातील पहिल्याच महिला पालिका आयुक्त तथा प्रशासक ठरल्या आहेत. एक ऑक्टोबर 1983 पासून स्थापन झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत एका तरुण महिला सनदी अधिकार्‍याला आयुक्तपदी येण्यास पालिकेच्या स्थापनेपासून तब्बल चाळीस वर्षे लागली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -