केडीएमसीचे रुक्मिणीबाई रुग्णालय असून नसल्यासारखे

रुग्णालयातील कारभारावर शिवसेनेकडून प्रश्नचिन्ह

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे वैद्यकीय उपचारासाठी असणारे बाई रुक्मिणी रुग्णालय कार्यरत असून ते असून नसल्यासारखे असल्याचा सवाल शिवसेनेचे कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांनी पालिका प्रशासक डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्यासमोर उपस्थित केला आहे. रुग्णाने सोनोग्राफी कोणत्या सेंटर मधून करायची हा रुग्णालयातील आपला स्टाफ ठरवीत असल्याने सोनोग्राफी सेंटर चालकाबरोबर आर्थिक सेटिंग होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केला आहे. करोडो रुपये खर्च करीत कल्याण शहरात बाई रुक्मिणी रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. शहर व ग्रामीण परिसरातील वंचित घटक उपचाराकरिता येथे येत असतो. मात्र रुग्णांच्या समस्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना आढळून येत आहे. वैद्यकीय उपचारांचा गलथान कारभार सुरू असल्याने प्रशासक डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने यावेळी सांगितले.

वसंत व्हॅली येथील प्रसूतीगृह चांगली सेवा देत आहे मात्र या ठिकाणी सोनोग्राफी मशीन नसल्याने महिला रुग्णांना सेटिंग असलेल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये पाठवले जात असल्याचे यावेळी शिवसेनेने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. रुक्मिणी बाई रुग्णालयातील संपूर्ण एक मजला खाजगी ब्लड बँकेसाठी देण्यात आला आहे. मात्र या बँकेकडून रुग्णालयातील रुग्णांना किती उपयोग होतो असे निवेदनात नमूद करीत रक्त तपासणीसाठी ही रुग्णांना खासगी पॅथॉलॉजी मध्ये पाठवले जात असल्याने येथे देखील आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रुग्णांची विनामूल्य रक्त तपासणी सुविधा देणे गरजेचे असताना येथे मात्र रुग्णांना तपासणी करता ठराविक पॅथॉलॉजी मध्ये पाठविले जाते.
रुक्मिणी रुग्णालयात पाच रुग्णवाहिका असून तीन वसंत व्हॅली प्रसूती गृहात आणि तीन शव वाहिका उपलब्ध आहेत. वंचित घटकातील रुग्णांचे नातलग रुग्णवाहिका सेवा सांगण्यास गेल्यास त्यांना खाजगी रुग्णवाहिकांचे नंबर दिले जातात. खाजगी रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणात रुग्णांची आर्थिक लुटमार करताना दिसून येत आहेत. एक्स-रे मशीन असून ती कधी चालू कधी बंद स्थितीत असते. तसेच ठराविक मेडिकल स्टोअर्स मधून गोळ्या औषधे आणण्यासाठी सेटिंग ची मोठी कसरत येथे पद्धतशीरपणे राबविली जात असल्याचे शिवसेनेचे शिष्टमंडळाने आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर दांगडे यांची भेट घेऊन निवेदनात केला आहे.

सर्व वैद्यकीय चाचण्यांसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कृष्णा डायग्नोसिस या खासगी संस्थेला प्रशासन जागा उपलब्ध करून देणार आहे. शिवसेनेने या संस्थेला जागा देण्यास तीव्र विरोध दर्शविला असल्याचे शिवसेनेचे कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख विजय तथा बंड्या साळवी यांनी म्हटले आहे. या शिष्टमंडळात प्रामुख्याने शिवसेना कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे, विजयताई पोटे, वंडर कारभारी, विजय काटकर, दशरत तरे, दया शंकर शेट्टी, सुरेश सोनार, राजेश महाले, अरुण बागवे, दत्ता खंडागळे, सुधीर कंक, भागवत बैसाणे, प्रदीप साळवी, अमोल गायकवाड, अ‍ॅडवोकेट सुरज पातकर, सतीश वायचळ, समीर मानकर, समीप काळे असे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.