कोकण शिक्षक मतदारसंघ पुन्हा ताब्यात मिळवू, रवींद्र चव्हाण यांचा विश्वास

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक फेब्रुवारी २०२३ ला होणार असून मतदार नोंदणी व संघटनात्मक बांधणीसाठी ठाणे येथील सहयोग मंदिर येथे एका बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.

ठाणे – कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ असून मागील अपवाद वगळता यावेळच्या निवडणुकीत पुन्हा हा मतदारसंघ ताब्यात घेऊ असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक फेब्रुवारी २०२३ ला होणार असून मतदार नोंदणी व संघटनात्मक बांधणीसाठी ठाणे येथील सहयोग मंदिर येथे एका बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समवेत आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव संदीप लेले,  आमदार संजय केळकर, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, विकास पाटील, भाजपा शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ संयोजक आल्हाद जोशी, शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, कोकण विभाग संयोजक एन एम भामरे यांच्यासह ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील तीनशेहून अधिक संस्थाचालक, शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – एसी लोकल बंद केल्या पाहिजेत; रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर शरद पवार आक्रमक

निवडणूक आयोगाने जरी एक ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होणार सांगितले असले तरी सहा महिन्यांपासून कोकण विभागाच्या नोंदणीचे काम भाजपाने शिक्षकांची माहिती गुगल फॉर्मच्या माध्यमातून संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. असे सभेच्या प्रास्ताविकात भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले. आजमितीस ठाणे व पालघर जिल्ह्यात अकरा हजार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन हजार, मुंबईत शाळेत असणारे पण कोकण शिक्षक मतदारसंघात मतदार असलेले सहा हजाराहून अधिक पात्र शिक्षकांची माहिती संकलित केली असून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात काम सुरू आहे. प्रत्यक्ष नोंदणी सुरू झाली की याला अधिक गती मिळेल असा विश्वास बोरनारे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – विसर्जनासाठी ठाणे पालिकेचा पर्यावरणाभिमूख निर्णय, प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती

आमदार निरंजन डावखरे यांनी मागील वेळेस झालेली मत विभागणी होऊ नये, यासाठी दक्ष राहणार असून अनुदानित शाळांबरोबरच विना अनुदानित व सेल्फ फायनान्स शाळेतील नोंदणीवर भर देणार असल्याचे सांगितले. आमदार केळकर यांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघात शिक्षक आमदार संत सर, वसंतराव बापट, भालेराव सर व रामनाथ मोते यांनी प्रभावीपणे काम केले असून मागील अपवाद वगळता हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात येण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. भाजपा शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ ठाणे जिल्ह्याध्यक्ष सचिन मोरे यांनी आभार व्यक्त केले.