तानसा अभयारण्यात पाण्याअभावी पशुपक्ष्यांची तडफड

प्राणी पक्ष्यांसाठीच्या वाॅटरहोलमध्ये दगडगोटे

ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यातील वन्य प्राण्यांची उन्हाळ्यात पाण्यासाठी प्रचंड तडफड सुरु असताना राज्य सरकारच्या तानसा वन्यजीव विभागाच्या अधिकारी व वन कर्माचाऱ्यांच्या अक्षम्य बेपर्वाईमुळे अभयारण्यातील बशीच्या आकाराचे कृत्रिम पाणवठे (वॉटर होल ) पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी असलेल्या या कृत्रिम पानवठ्यांची वन्यजीव विभाग व प्रादेशिक विभागाने वेळेवर देखभाल व दुरुस्ती न ठेवल्याने दाट जंगलात बांधण्यात आलेल्या बहुतांश वॉटर होल बशींची आता प्रचंड पडझड झाली आहे.

बांधकाम जीर्ण होऊन ढासळेल्या या पानवठ्यांच्या बश्यांमध्ये माती, दगड आहे. उन्हाळ्या मोसमातील या मार्च महिन्यातील कडाक्याच्या उन्हात पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून जंगलातील वन्यप्राण्यांचा जीव अक्षरशः तहानेने कासावीस होत असताना येथील कुत्रीम पानवठ्यांतील बशीत पाणीच नसल्याने वन्य प्राण्यांचे पाण्या अभावी भयानक हाल सुरु आहेत.
तानसा वन्यजीव विभाग व प्रादेशिक वन विभागाने जंगलात उन्हाळ्यांत वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी कोणतीच सोय या वर्षी केली नसल्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे. तानसा अभयारण्यातील ३२० चौरस किलोमीटर क्षेत्रात येणाऱ्या तानसा, खर्डी, वैतरणा, परळी, सुर्यमाळ पर्यंत असे विस्तीर्ण घनदाट जंगल आहे. या जंगलात बिबटे , तरस, कोल्हे , भेकर, ससे, रानडुक्कर, वानर, रानमांजर यांसह इतर लहान वन्यप्राणी वास्तव्य करीत आहेत.

या तानसा अभायरण्य वन्यप्राण्यांना दरवर्षी उन्हाळ्याच्या मोसमात पिण्यासाठी जंगलातच पाणी मिळावे म्हणून सरकारच्या वन्यजीव विभागाकडुन व प्रादेशिक वन विभागाकडून बशीच्या आकाराचे सिमेंट काँक्रेटचे कृत्रिम ( पाणवठे) वॉटर होल म्हणजेच पानस्थळे बांधली जातात. त्या कृत्रीम पाणवठ्यात वन विभागाकडून टँकर अथवा बैलगाडीने पाणी आणून त्यात ओतले जाते. वन्यप्राण्यांचे पाण्यांविना हाल होऊ नयेत त्यामुळे बशीच्या आकाराचे सिमेंट काँक्रीटचे कृत्रिम पानवठे, वॉटर होल बांधण्यासाठी खास सरकारी निधीची विशेष तरतूद केली जाते. मात्र अभायरण्यात व प्रादेशिक विभागाच्या जंगलात या वर्षी नवीन हे अपाण्यावठे तर बांधले नाहीतच परंतु यापूर्वी जंगलात बांधण्यात आलेल्या जुन्या पाणवठ्यांकडे देखील वन विभागाच्या संबंधीत वनक्षेत्रपालांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे दाट जंगलातील बशीच्या आकाराचे कृत्रिम पाणवठे कोरडेठाक पडले आहेत.

जंगलात बशीच्या आकाराचे वॉटर होल कृत्रिम पाणवठे (पानस्थळ ) तयार केली जातात हे खरे आहे. या कामांसाठी निधी मिळावा म्हणून वन्यजीव विभाग ठाणे यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने जंगलात नवीन वॉटर होल पानवठ्यांची कामे यावर्षी करता आली नाहीत.
– दिपक मते, सहाय्यक वनसंरक्षक वन्य जीव विभाग तानसा अभायारण्य