Eco friendly bappa Competition
घर ठाणे ठाणे जिल्ह्यात ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरुवात

ठाणे जिल्ह्यात ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरुवात

Subscribe
जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून आयुष्मान भव ही मोहिम सुरू होणार आहे. या मोहिमेअंतर्गत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका यांनी सूक्ष्म नियोजनाप्रमाणे कामे करावीत. तसेच जिल्ह्यातील सर्व पात्र १०० टक्के लाभार्थ्यांचे  आयुष्मान कार्ड काढण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी गुरुवारी येथे दिले. आयुष्मान भव मोहिमेसंदर्भात जिंदल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित बैठकीत आढावा घेतला व सूचना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारत मासाळ यांच्यासह गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
आयुष्मान भव ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम आहे. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ही मोहिम जिल्ह्यात राबवायची आहे. या कालावधीत आयुष्मान आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १६ लाख नागरिकांचे आयुष्मान कार्ड काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ततेसाठी सर्वांनी नियोजन करावे. आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन कार्डसाठी नोंदणी करून घेणार असून कार्डचे वाटप करणार आहेत. यासाठी आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहन भत्ताही देण्यात येणार आहे. या मोहिमेची माहिती जनतेपर्यंत व्हावी, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत व आरोग्य वर्धिनीमध्ये आयुष्मान सभा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिंदल यांनी सांगितले.
आयुष्मान मेळाव्या अंतर्गत आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्रावर दर आठवड्याला शनिवारी किंवा रविवारी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. दर आठवड्याला वेगवेगळ्या आजारांची तपासणी यात होणार आहे. तसेच या मेळाव्यात आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड तयार करणे, सर्व समावेशक आरोग्य सेवा, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार, परिहारक उपचार, मौखिक, नेत्र, कान, नाक व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा, प्रयोगशाळा तपासणी तसेच टेलिकन्स्लटेशन आदी सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात आयुष्मान भव मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य सेवांच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिंदल यांनी यावेळी दिले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -