घरठाणेहलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही - मुख्यमंत्री

हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही – मुख्यमंत्री

Subscribe

हे लोकांचे सरकार आहे हे सर्व सामान्य लोकांना न्याय देणारे सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणूसच आपला केंद्रबिंदू आहे. मग त्यांच्या सोयी सुविधांमध्ये कुठल्याही अधिकाराला हालगर्जीपणा करता येणार नाही आणि तो हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. याचदरम्यान, त्यांनी हे प्रत्येक अधिकाऱ्याने लक्षात ठेवले पाहिजे, शेवटी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. प्रत्येक अधिकारी जेव्हा या शहरांमध्ये येतो तेव्हा त्यांनी अशी भावना ठेवली पाहिजे. मला हे शहर काय देणार आहे, यापेक्षा मी या शहराला काय देतोय, मी या राज्याला काय देतोय मी या देशाला काय देतोय हे जर प्रत्येकाने ठरवलं तर आपले शहर, आपला जिल्हा एवढे विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथाकडे जातील आणि आपल्याला मागे वळून पाहायची आवश्यकता लागणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार, ठाणे महापालिका, ठाणे स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध विकास कामे करण्यात आली आहेत. त्यात कोपरी मीठबंदर येथील खाडी सुशोभीकरण, गावदेवी भूमीगत वाहनतळ, कळवा खाडी सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष, शस्त्रक्रिया विभाग आणि वाचनालय, ज्ञानसाधना महाविद्यालय येथील उद्यान, परिवहन सेवेच्या विजेवरील बसगाड्या या प्रकल्पांचे शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात केले. याशिवाय नव्याने तयार करण्यात आलेले वाहतूक बेट आणि रस्ते मजबुतीकरण महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची वागळे इस्टेट येथे सभा झाली. त्यावेळी संबोधिताना त्यांनी वरील इशारा महापालिका अधिकाऱ्यांना दिला. पुढे बोलताना, त्यांनी हे ठाणे शहर हे देखील मुंबई प्रमाणे एक नवीन ओळख निर्माण करणारे शहर करा, त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे शहर करा कारण ठाणे मुंबईला जोडून हे शहर आहे आणि म्हणून मला जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आपण पूर्ण करा, त्यासाठी जे जे काही लागेल ते सरकार म्हणून देण्याचे काम ही एकनाथ शिंदे करेल अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

तर प्रधानमंत्री मोदी यांनी देखील या राज्याच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केलेली आहे आणि म्हणून हे राज्य आणि केंद्र सरकार आता डबल इंजिनच सरकार म्हणून काम करतेय आणि नक्की त्याचा फायदा या ठाणे शहराला देखील झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आता तुमचा ठाणेकर मुख्यमंत्री झालेला आहे. असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. १६५ इलेक्ट्रिक व्हेईकल म्हणजे प्रदूषण मुक्त ठाणे करण्याची ही पहिली पायरी आहे. असे सांगताना,
मुंबई देशाची राजधानी आहे, या ठिकाणच्या रस्त्यांचा कायापालट केला जात आहे. पुढील अडीच वर्षात मुंबई खड्डे मुक्त होणार आहे. तसेच ठाण्यातील रस्ते देखील खड्डे मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. तलाव सुशोभीकरणाचे कामही ठाण्यात हाती घेण्यात आली आहेत. जोगीला तलावाचे पुनरुज्जीवन केले जात आहे. अशाच पध्दतीने ठाण्याची जी तलावांचे शहर म्हणून ओळख आहे, ती पुसु द्यायची नसल्याचेही त्यांनी सांगितले. चांगले रस्ते, सार्वजनिक शौचालये स्वच्छ झाली पाहिजे. त्यानुसार योग्यरित्या कामे करा, झोपडपट्टी भागातील सार्वजनिक शौचालयांकडे प्राधान्याने लक्ष द्या अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

ठाणे शहर हे बदलते आहे. रस्ते पावसाळ्यापूर्वी तयार झाले पाहिजे. कॉंक्रीटीकरणाची कामेही वेळेत करा असेही त्यांनी सांगितले. शहराचे एन्ट्री पॉईंट ही शहराची ओळख असते, त्यानुसार हे एन्ट्री पॉईन्ट ठाण्याची ओळख कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. ठाणेकरांचा वाहतुक कोंडीतून सुटका करायची आहे. त्यामुळे शहराच्या बाहेरुन वाहतुक नेण्याचे नियोजन आखण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाकडून जो काही निधी मिळाला आहे, त्याचा विनियोग करा, जनतेसाठी पैसा वापरला गेला पाहिजे. चांगले रस्ते, सुशोभिकरण, सार्वजनिक शौचालये आदींसह इतर कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत. जे या कामात कचराई करतील अशांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. तर कळवा रुग्णालयात देखील डॉक्टर चांगले काम करीत आहेत. परंतु त्यांच्या हॉस्टेलमध्ये सुविधा नाहीत, त्यामुळे जे सुविधा देत नसतील त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

- Advertisement -

नवीन ठाणे स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे, राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार मदत करत आहे, तुमच्या ठाण्याचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे कोणीही विकासापासून वंचित ठेवला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ठाण्याला  ओळख निर्माण करुन देण्याचे काम तुमचे आमचे आहे. त्यामुळे नागरीकांनी देखील जबाबदारीने वागले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
क्लस्टरला लवकरच सुरवात
क्लस्टरचा विकास लवकर केला जाणार आहे, यासाठी सिडकोला सोबत घेतले आहे, अडचणी दूर केल्या आहेत, त्यामुळे तातडीने या कामाला प्राधान्य देऊन सुरवात करा असेही त्यांनी सांगितले. आपल्याला संक्रमण शिबिरात राहावे लागेल अशी नागरीकांना भिती वाटत आहे. मात्र त्यांना तेथे न राहता थेट हक्काच्या घरांच्या चाव्या दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोपरीत सीएम व्हीथ सेल्फी
कोपरी येथील खाडी सुशोभीकरण प्रकल्प लोकार्पण कार्यक्रम पार पडले. त्यानंतर अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. शिंदे यांनी ही कोणाला नाराज केले नाही. त्यांनी ही सेल्फी काढण्यासाठी पोझ दिली.
कळव्यातील कार्यक्रमाला आव्हाड अनुपस्थित
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. याचदरम्यान कळव्यातील कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनुपस्थित राहिल्याचे पाहण्यास मिळाले. त्यांनी याबाबत समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करत ‘मला या गोष्टीचा आनंद आहे की, या सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत आहेत’, असे म्हटले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उपोषण मागे
कोपरी येथील सिद्धार्थ नगर भागातील झोपडपट्टी मधील रहिवाशांनी आपल्या हक्कांच्या घरांसाठी मागील काही दिवसापासून उपोषण सुरू केले होते. शनिवारी प्रकल्प लोकपर्ण कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांच्या घरांचा प्रश्न लवकरच सोडायला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर रहिवाशांनी उपोषण मागे घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -