ठाणे : शहरातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली रविवारी (5 मे) किसन नगर परिसरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या रॅलीला सुरुवात झाली असतानाच घडलेल्या एका घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा एक आगळा वेगळा अनुभव ठाणेकरांना पहायला मिळाला. (Lok Sabha Election 2024 Chief Minister Eknath Shinde rushed to help Rudransh whose hand was burnt)
शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसन नगर परिसरात पोहोचली, रॅली सुरू असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांना एक आई आपल्या जखमी मुलाचा हात हातात घेऊन रस्त्याने चाललेली दिसली. या आईच्या खांद्यावर एक मूल तर हातात दुसरे मूल होते. हातात असलेल्या मुलाचा हात गंभीररित्या भाजलेला असल्याने ती त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. अशात मुख्यमंत्र्यांनी तिला पाहिले आणि त्या माऊलीची अडचण जाणून घेत ते रॅली सोडून तिच्या मदतीला धावून गेले. त्यांनी तत्काळ त्या मुलाला आपल्यासोबत घेतले आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टराना त्यांच्या भाजलेल्या हातावर तत्काळ उपचार करायला सांगितले.
हेही वाचा – Sharad Pawar : प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे सोमवारचे कार्यक्रम रद्द
रुद्रांश रोनीत चौधरी असे या नऊ वर्षाच्या मुलाचे नाव आहे. घरात खेळत असताना अचानक हातावर तेल सांडल्याने त्याचा हात गंभीररीत्या भाजला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याला रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू झाले. तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले. प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे त्यांची संवेदनशील मुख्यमंत्री ही ओळख ठाणेकर नागरिकांसमोर पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
यापूर्वीही मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलपणा महाराष्ट्राने पाहिला
दरम्यान, यापूर्वीही अनेकदा मुख्यमंत्र्यांचा हा संवेदनशीलपणा महाराष्ट्राने पाहिला आहे. एका दौऱ्यावेळी अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णावाहिकेतून रुग्णालयात पाठवून त्यांनी रुग्णाची चौकशी केली होती. तर, डॉक्टरांनाही उपचारासाठी सूचना केल्या होत्या. याशिवाय आठवड्याभरापूर्वी मुंबईच्या दिशेने येत असताना एकनाथ शिंदे यांना एका डंपरचा अपघात झालेला दिसला. या डंपरमधून ऑइल खाली सांडत असल्याने दुचाकीस्वार घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तत्काळ आपला ताफा थांबवला आणि घटनास्थळाची परिस्थिती पाहिली. तसेच सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या मदतीने त्यांनी सांडलेल्या ऑईलवर माती टाकून घेतली आणि स्टाफमधील पोलिसांच्या मदतीने दुचाकीस्वारांना एका बाजूने हळू जाण्याचे आवाहन केले.
हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : अरे मामा जपून…, शरद पवारांनी दत्तात्रय भरणेंना सुनावले
Edited By – Rohit Patil